पहिल्या महाविद्यालयाचे सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2020 01:23 AM2020-02-17T01:23:10+5:302020-02-17T01:23:15+5:30

पनवेलमधील गोरगरिबांचे ज्ञानमंदिर : मार्चमध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत होणार सोहळा, आजी-माजी विद्यार्थी येणार एकत्र

The first college debuts in the golden festival year | पहिल्या महाविद्यालयाचे सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण

पहिल्या महाविद्यालयाचे सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण

Next

वैभव गायकर

पनवेल : मागील काही वर्षांत पनवेल शहराचा कायापालट झाला आहे. प्रस्तावित आंतरराष्ट्रीन विमानतळ प्रकल्पामुळे पनवेलची ख्याती सातासमुद्राच्या पलीकडे पोहोचली आहे. ५० वर्षांपूर्वी पनवेल व शेजारच्या उरण परिसरात केवळ शेती आणि मत्सव्यवसाय होता. शिक्षणाच्या सुविधा नव्हत्या. अशा परिस्थितीत रयत शिक्षण संस्थेने महात्मा फुले कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे एक रोपटे पनवेलमध्ये रोवले. या रोपट्याचा आता वटवृक्ष झाला आहे. सुरुवातीच्या काळात केवळ १९२ पटसंख्या असलेल्या या महाविद्यालयात आता तीन हजारांपेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. अगदी प्रतिकूल अवस्थेत सुरू झालेले हे महाविद्यालय पुढच्या महिन्यात सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे.

रायगड जिल्ह्यातील पनवेल, उरण, खोपोली, पेण, कर्जत आदीसह ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील विद्यार्थी या ठिकाणी शिक्षणासाठी येत होते. प्रकल्पग्रस्तांचे नेते दिवंगत दि. बा. पाटील हे या महाविद्यालयाचे पहिले चेअरमन होते. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी पाहिलेले स्वप्न सत्यात उतरविण्याचे काम या महाविद्यालयाच्या माध्यमातून सुरू आहे.
पनवेलच्या राजकारणात, समाजकारणात तसेच महत्त्वाच्या उद्योगधंद्यात पारंगत असलेले व्यावसायिक राजकारणी बहुतांशी याच महाविद्यालयातून घडले आहेत. सध्याच्या घडीला महाविद्यालयाचे चेअरमन माजी खासदार रामशेठ ठाकूर हे आहेत. प्राचार्यपदाची धुरा डॉ. गणेश ठाकूर हे सांभाळत आहेत. महाविद्यालयात जवळपास १५० शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा स्टाफ कार्यरत आहे. यात शिक्षकांची संख्या १०० च्या आसपास आहे. महाविद्यालयाचे यंदाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. या महोत्सवासाठी महाविद्यालयात तयारी सुरू आहे. त्यासाठी महाविद्यालय विकास समितीसह माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला आहे. या महोत्सवाकरिता रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित राहणार आहेत. सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त स्मार्ट क्लासरूम, ग्रंथालय वेबसाइट, कॅप सेंटर, फोटो गॅलरी, आॅफिस रेकॉर्ड रूम आदी प्रशस्त दालनांचे उद्घाटनही करण्यात येणार आहे.

महाविद्यालयाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करण्यासाठी सर्व आजी-माजी विद्यार्थी एकवटले आहेत. रयत शिक्षण संस्थेच्या या महाविद्यालयात आजवर मोठ्या संख्येने विद्यार्थी घडले आहेत. या महोत्सवाच्या माध्यमातून महाविद्यालयाच्या आजी-माजी विद्यार्थ्यांना एकत्रित आणण्याच्या दृष्टीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असल्याचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश ठाकूर यांनी स्पष्ट केले आहे. सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट करण्यासाठी महाविद्यालयाच्या माध्यमातून सोमवारी एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त महाविद्यालयाचे आजी-माजी विद्यार्थी एकत्रित येणार आहेत. या कार्यक्रमाचे नियोजन सुरू आहे. सर्व विद्यार्थ्यांनी यामध्ये आपला सहभाग नोंदवावा, त्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.
- महेंद्र घरत, अध्यक्ष, माजी विद्यार्थी संघटन, महात्मा फुले महाविद्यालय

माजी विद्यार्थी व विकास समितीचे मदतीचे हात
महाविद्यालय उभारणीत विकास समितीने आपले मोलाचे योगदान दिले आहे. यामध्ये माजी आमदार दिवंगत दत्तुशेठ पाटील, प्रकल्पग्रस्त नेते दिवंगत दि. बा. पाटील, माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार बाळाराम पाटील, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, कामगार नेते महेंद्र घरत, प्रीतम म्हात्रे आदीसह महाविद्यालयाच्या असंख्य विद्यार्थ्यांनी महाविद्यलयाचे पावित्र्य अबाधित राखण्याचा सकारात्मक प्रयत्न केला आहे.

विविध पुरस्कारांनी सन्मानित : महात्मा फुले कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय पनवेलला विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. मुंबई विद्यापीठाचा उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार (२०१०), महाराष्ट्र राज्य पुरस्कृत जागर जाणिवांचा अभियान अंतर्गत विद्यापीठस्तरीय प्रथम पुरस्कार, रयत शिक्षण संस्थेचा आदर्श विद्यालय पुरस्कार, मुंबई विद्यापीठाचा बेस्ट एनएसएस युनिट पुरस्कार आदीसह विविध नामांकित पुरस्कारांचा यात समावेश आहे.
 

Web Title: The first college debuts in the golden festival year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड