कोरोनाबाधित दिव्यांगांकरिता नवी मुंबईत राज्यातील पहिले रुग्णालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2020 12:09 AM2020-06-05T00:09:50+5:302020-06-05T00:09:54+5:30
२५ बेडची व्यवस्था : सीवूडमध्ये उपलब्ध होणार अद्ययावत सुविधा
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : नवी मुंबईमध्ये महानगरपालिकेने खाजगी संस्थेच्या सहकार्याने कोरोनाबाधित दिव्यांग नागरिकांसाठी स्वतंत्र रुग्णालय सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सीवूडमधील या रुग्णालयात अद्ययावत सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून हा राज्यातील पहिला उपक्रम असणार आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेने कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू केले आहेत. रुग्णांवर त्यांच्या लक्षणांची तीव्रता लक्षात घेऊन सीसीसी, डीसीएससी व डीसीएच अशा तीन स्तरांवर उपचार सुविधा उपलब्ध करून दिली आहे. अशाच प्रकारे शारीरिक कमतरता असणाऱ्या दिव्यांग व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्यास अशा पॉझिटिव्ह दिव्यांग व्यक्तींना विशेष उपचार सुविधा मिळाव्यात यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्याचा निर्णय महानगरपालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी घेतला आहे. त्यासाठी सीवूड नेरूळ येथील न्युरोजन ब्रेन अॅण्ड स्पाईन इन्स्टिट्यूट या रुग्णालयातील ७५ बेड्सपैकी २५ बेड्स कोरोनाबाधित दिव्यांग व्यक्तींच्या उपचारासाठी राखीव ठेवल्या आहेत. नवी मुंबई महानगरपालिकेच्या सहयोगाने न्युरोजनच्या वतीने खास दिव्यांगांसाठीचे हे महाराष्ट्रातील पहिले स्पेशल कोविड हॉस्पिटल कार्यान्वित होत आहे.
या ठिकाणी दिव्यांगांच्या सर्व अडचणींचा वचार करून त्यांना हालचाल करणे सुलभ जावे अशा प्रकारे विशेष खोलींची निर्मिती करण्यात आलेली आहे. व्हीलचेअर, दिव्यांगांना वापरण्यास सोयीची अशी स्वच्छतागृहे आहेत. या ठिकाणी आॅटिझम, सेरिब्रल पाल्सीसारखे आजार, इंटेक्चुअल डिसॅबिलिटीचा विचार करून व्यवस्था करण्यात आलेली आहे. या रुग्णालयामध्ये आॅक्सिजन सपोर्ट, व्हेंटिलेटर तसेच इंटेसिव्ह केअर सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. त्याचप्रमाणे कोविड १९ बाधित दिव्यांगांवरील उपचाराचा विचार करून वैद्यकीय क्षेत्रातील अद्ययावत उपचार पद्धतीचा वापर करण्यात येणार आहे.