एक्स्प्रेस वेवरील पहिल्या लेनवरील वाहने सुसाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 12:43 AM2018-03-28T00:43:04+5:302018-03-28T00:43:04+5:30

यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील पहिल्या लेनमधून प्रवास करताना ताशी ८० कि.मी. गतीपेक्षा कमी वेगाने वाहन

First lane vehicles on expressway are comfortable | एक्स्प्रेस वेवरील पहिल्या लेनवरील वाहने सुसाट

एक्स्प्रेस वेवरील पहिल्या लेनवरील वाहने सुसाट

Next

जयंत धुळप 
अलिबाग : यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील पहिल्या लेनमधून प्रवास करताना ताशी ८० कि.मी. गतीपेक्षा कमी वेगाने वाहन चालविण्यास मनाई करणारी अधिसूचना राज्याच्या वाहतूक विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक आर. के. पद्मनाभन यांनी जारी केली आहे. त्यामुळे आता पहिल्या लेनमधून वाहने सुसाट धावणार आहेत.
एक्स्प्रेसवेवरील अपघात व वाहतूककोंडी होऊ नये, यासाठी द्रुतगती महामार्गावरील प्रत्येक वाहिनीत तीन लेन असतात. त्यापैकी कार, जीप, टेम्पो या हलक्या वाहनांनी द्रुतगती महामार्गाच्या मध्य लेनमधून, जड-अवजड वाहनांनी सर्व्हिस लेनला लागून असलेल्या सर्वात डाव्याकडील लेनमधून प्रवास करणे अपेक्षित असते. तसेच त्यांनी केवळ पुढील वाहनास ओव्हरटेक करताना उजवीकडील लेनचा अवलंब करून लेनमधील उजवीकडील लेन कायम रिकामी ठेवणे आवश्यक आहे.
पहिली लेन ही ओव्हरटेककरिता आहे. तथापि, बरीच वाहने पहिल्या लेनमधून प्रवास करताना ताशी ८० कि. मी. गतीचा वापर न करता, त्यापेक्षा कमी गतीने वाहने चालवितात. त्यामुळे पाठीमागून येणाऱ्या चालकांना वाहन चालविण्यास अडथळा निर्माण होऊन अपघात होण्याची दाट शक्यता असते. द्रुतगती महामार्गावर अपघात आणि वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी तसेच लेनच्या शिस्तीचे पालन करणे यासाठी मोटार वाहन कायद्यान्वये अप्पर पोलीस महासंचालक (वाहतूक) आर. के. पद्मनाभन यांनी ही अधिसूचना जारी केली आहे.
अधिसूचनेत नमूद केल्यानुसार, उजवी लेन ही हलक्या वाहनांच्या ओव्हर टेकिंगसाठी राखीव असून, कमी गतीने वाहन चालविण्यास मनाई असल्याबाबत टोल तिकिटावर अटी व शर्ती म्हणून लेखी स्वरूपात नमूद करावी. तसेच याबाबत बोर्ड, चिन्हे, फलक व तत्सम सूचना योग्य ठिकाणी लावण्याबाबतची अंमलबजावणी महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने करावी, असे निर्देशही देण्यात आले आहेत. अधिसूचना पुढील आदेश निर्गमित होईपर्यंत लागू राहील, असे आवाहन पद्मनाभन यांनी केले आहे.
 

Web Title: First lane vehicles on expressway are comfortable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.