लोकमत न्युज नेटवर्क
अलिबाग : रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील नारंगी गावाचे वरुण पाटील यांच्या बागायती मधील पहिला हापूस आणि केसर जातीच्या आंब्याच्या पहिल्या पेट्या मुंबई बाजारात शनिवारी दाखल होणार आहेत. हापूस आणि केसर जातीच्या प्रत्येकी चार पेट्या वाशी बाजारात शनिवारी दाखल होणार आहेत. डझनाला १० हजार रुपये दर मिळेल अशी माहिती आंबा बागायतदार वरुण पाटील यांनी दिली आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही रायगडाचा हापूस आंब्याची पेटी बाजारात नेणारे वरुण पाटील हे पहिले ठरले आहेत.
रत्नागिरीच्या हापूस आंब्याची पहिली पेटी ही गेल्या महिन्यात मुंबई बाजारात दाखल झाली होती. रायगड जिल्ह्यातही हापूस आंब्याचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. रायगडच्या हापूस आंब्याची चवही रत्नागिरी प्रमाणेच असल्याने त्यालाही बाजारात मोठी मागणी आहे. रायगड जिल्ह्यात अलिबाग तालुक्यासह श्रीवर्धन, रोहा, तळा, म्हसळा, मुरुड याठिकाणी आंब्याचे मोठे उत्पादन बागायतदार घेत आहेत.
अलिबाग तालुक्यातील नारंगी गावाचे वरुण पाटील हे आंबा बागायतदार आहेत. ४० हेक्टर जागेवर पाटील यांनी आंब्याची बागायत केली आहे. या बागेतून दरवर्षी ४० हजार पेट्या आंबे उत्पादन घेत आहेत. यंदाही जानेवारी महिन्यात पहिला रायगडाचा आंबा बाजारात नेणारे पाटील हे अग्रस्थानी राहिले आहेत. शुक्रवारी पाटील यांनी आपल्या बागायती मधून हापूस आणि केशर आंबा उतरवला आहे. या आंब्याच्या प्रत्येकी दोन डझनाच्या चार पेट्या भरल्या आहेत.
बागायती मधून काढलेल्या आंब्याची कुटुंबाने पूजा करून हा आंबा पेट्या मध्ये भरला आहे. शनिवारी पहिली जिल्ह्यातील आंब्याची पेटी घेऊन वरुण पाटील हे वाशी बाजारात नेणार आहेत. एक डझनला दहा हजाराचा दर मिळेल अशी आशा पाटील यांनी व्यक्त केली आहे.