उजाड डोंगर हिरवा करण्याचा तरु णांचा संकल्प, पहिल्या टप्प्यात ५१२ खड्डे खोदले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2019 02:21 AM2019-06-27T02:21:53+5:302019-06-27T02:23:42+5:30
फार वर्षांपूर्वी वृक्षराजींनी नटलेला आपल्या गावासमोरील डोंगर आता उजाड झाला आहे. येथील जैवविविधता नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.
- विनोद भोईर
पाली - फार वर्षांपूर्वी वृक्षराजींनी नटलेला आपल्या गावासमोरील डोंगर आता उजाड झाला आहे. येथील जैवविविधता नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. ही गोष्ट वावे गावातील तरुणांना बैचेन करत होती. यावर सर्व तरुणांनी गावासमोरील उजाड झालेले जंगल पुन्हा एकदा हिरवेगार करण्याचा संकल्प के ला.तरुणांसह ग्रामस्थांनी त्या डोंगरावर शास्त्रशुद्ध पद्धतीने ५१२ झाडे लावण्याचे नियोजन के ले आहे.
या मोहिमेतील पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. या पहिल्या टप्प्यात ५१२ खड्डे खोडण्याचे काम पूर्णत्वास आले असून, पाऊस पडल्यानंतर यामध्ये वृक्षलागवड करण्यात येणार आहे. खड्डे किती रुंद व खोल असावेत, त्यांच्यातील अंतर किती असावे. त्यात कोणती माती व खत टाकावे आणि त्यानंतर खड्ड्यात कोणत्या प्रकारची रोपे लावावीत, यासाठी वनविभागाकडून सर्व शास्त्रशुद्ध माहिती घेतली जात आहे. या अभियानास वनविभागाचे मार्गदर्शन व सहकार्य आहे.
जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ५१२ खड्ड्यांत रोपे लागवड करण्यात येतील. नुसते रोपे लावून न थांबता ती जगविण्यावर अधिक भर देऊन त्यांचे योग्य संगोपन करण्यात येणार आहे. या मेहनतीचे संपूर्ण श्रेय वावे गावातील तरुणांचे आहे, असे गावातील तरुण व भैरीनाथ क्रीडामंडळाने सांगितले.
अशा स्वरूपाची मोहीम संपूर्ण तालुकाभर राबविण्याचे आवाहन शिवऋण प्रतिष्ठानने केले आहे. त्याचप्रमाणे वावे गावातील सर्व तरुणांनी पुढाकार घेऊन तालुक्यात सर्वप्रथम वृक्षलागवडीकरिता सुरुवात केली. या मोहिमेच्या माध्यमातून शासनाच्या वृक्षलागवड अभियानासही मोठे सहकार्य मिळणार आहे.
मोहिमेत श्रमदान
गावातील तरुणांसोबतच लहानगेही हातात फावडे व कुदळ घेऊन या मोहिमेत श्रमदान करत आहेत. पर्यावरण संवर्धन व त्यासाठी सुरू केलेल्या वृक्षलागवड मोहिमेसाठी सारेच जण भारावून गेले आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून हे तरुण मोहिमेचे व्हिडीओ व फोटो अपलोड करत आहेत. तसेच सगळ्यांना आपल्या या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन करत आहेत. त्यांच्या कामाने प्रेरित होऊन इतर ठिकाणीही अशा स्वरूपाच्या मोहिमा सुरू करण्याचे ठरविले जात आहेत.