- अरुण जंगमम्हसळा : परंपरागत पद्धतीला नावीन्यपूर्ण प्रयोग आणि संशोधनाची जोड दिली तर शेती ही अजूनही उत्तम उत्पन्न देत असल्याचे रायगड जिल्ह्यातील म्हसळा येथील हिफझुर फकीह या ५६ वर्षांच्या शेतकऱ्याने दाखवून दिले आहे.
आपला देश हा कृषिप्रधान आहे व तो तसाच राहावा, हाच शेतकऱ्यांचा ध्यास असतो. केवळ शासनावर अवलंबून न राहता स्वत: मेहनत घेऊन म्हसळा तालुक्यातील वरवठणे (मुजफ्फरनगर) येथील हिफझुर या शेतकºयाने १२ गुंठ्यात इस्राईल पद्धतीने शक्यतो जिल्ह्यातील पहिली आल्याची (जिंजर) शेती तर उर्वरित १२ गुंठ्यात कलिंगडची शेती केली आहे. शेतकरी हिफझुर फकीह यांना त्यांच्या वडिलांकडून शेतीचा वारसा मिळाला असून, त्यांनी इस्राईल पद्धतीच्या युक्तीचा वापर करून शेती केली.
फकीह यांनी पहिल्या १२ गुंठ्यात बेड व ठिबक पद्धतीने आल्याची शेती केली असून, त्यांनी शेतीसाठी जी पद्धत वापरली आहे त्या पद्धतीमुळे त्यांना इतर शेती पद्धतीपेक्षा तीनपट जास्त उत्पादन मिळणार असल्याचे त्यांनी संगितले. याच पद्धतीने १२ गुंठ्यात कलिंगडची शेती केली आहे. फकीह यांना एकूण २४ गुंठ्यातील आले व कलिंगडच्या शेतीसाठी अडीच लाख रुपयांच्या खर्चातून आठ टन आले तर कालिंगडचे पाच टन उत्पादन मिळणार असल्याची खात्री आहे.
बाजारभावानुसार या उत्पादनाची मिळकत दहा लाख रुपये होईल, असे फकीह यांनी सांगितले. एकीकडे जिल्ह्यातील शेतकरी शेतीमध्ये काही नाही म्हणत आपला पारंपरिक शेती व्यवसाय सोडून मुंबई व पुणे येथे नोकरीसाठी जात असतानाच, ५६ वर्षीय शेतकरी फकीह यांनी जिल्ह्यातील पहिला यशस्वी आल्याचा शेतीप्रयोग केल्याचे कळताच संपूर्ण जिल्ह्यातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
शेतकºयाने केलेल्या आधुनिक शेतीसाठी रायगड जिल्हा परिषदेचे कृषी पशुसंवर्धन सभापती बबन मनवे यांनी शेतकºयाच्या शेतात जाऊन कौतुक केले. या वेळी त्यांच्यासोबत म्हसळा पंचायत समिती सभापती उज्ज्वला सावंत, माजी सभापती छाया म्हात्रे, उपसभापती मधू गायकर, सदस्य संदीप चाचले, उपनगराध्यक्ष शोएब हळदे, गटविकास अधिकारी वाय. एस. प्रभे, कृषी अधिकारी (प.स) मंगेश साळी, विस्तार अधिकारी अशोक बाक्कर आदीनी शेतकऱ्यांचे कौतुक केले.
म्हसळा येथील हिफझुर फकीह या शेतकऱ्यांनी जिल्ह्यात नवीन प्रयोग करीत आल्याची शेती केली आहे. फकीह यांचा आदर्श घेत, शेती या व्यवसायामध्ये आधुनिकता आणणाऱ्या व प्रयोगशील शेतकºयांना प्रोत्साहन देण्यासाठी रायगड जिल्हा परिषद कायम तत्पर असेल.- बबन मनवे, कृषी पशुसंवर्धन सभापती, जिल्हा परिषद