अलिबाग : आधी गुन्हे मागे घ्या मगच चर्चा; भूमिपुत्र शेतकऱ्याचा पावित्रा
By राजेश भोस्तेकर | Published: November 9, 2022 06:06 PM2022-11-09T18:06:59+5:302022-11-09T18:07:28+5:30
बल्क औषध निर्मित प्रकल्पाला विरोध दर्शविण्यासाठी मुरुड तालुक्यातील १४ गावातील भूमिपुत्रांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर १ नोव्हेंबर रोजी धडक मोर्चा काढला होता.
अलिबाग : बल्क औषध निर्मित प्रकल्पाला विरोध दर्शविण्यासाठी मुरुड तालुक्यातील १४ गावातील भूमिपुत्रांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर १ नोव्हेंबर रोजी धडक मोर्चा काढला होता. त्यानंतर भूमिपुत्रांसोबत १० नोव्हेंबर रोजी चर्चा करण्याबाबत प्रशासनाकडून पत्र संघटनेला पाठविण्यात आले होते. मात्र शांतता पूर्वक, परवानगी घेऊन आंदोलन करूनही २५ जणांवर अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. जोपर्यंत दाखल केलेले गुन्हे मागे घेत नाहीत तोपर्यंत संघटना चर्चेला बसणार नाही असा पवित्रा भूमिपुत्रांनी घेतला आहे. याबाबत ऍड महेश मोहिते यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी याना संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे. त्यामुळे बुधवारी १० नोव्हेंबर रोजी होणारी चर्चा फिस्कटली आहे.
मुरुड रोहा तालुक्यातील सतरा गावात केंद्राचा रद्द झालेला बल्क औषध निर्मित प्रकल्प राज्य शासनाच्या एमआयडीसीमार्फत उभारला जात आहे. या प्रकल्पाला आधीपासून येथील भूमिपुत्रांचा विरोध आहे. मात्र तरीही भूसंपादन प्रक्रिया प्रशासन स्तरावरून सुरू आहे. प्रकल्पाला असलेला विरोध दर्शविण्यासाठी भूमिपुत्र शेतकऱ्यांनी १ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला होता. या मोर्चाबाबत प्रशासनाला कळविण्यात आले होते. शेतकरी यांनी काढलेला मोर्चा हा शांततेत कायद्याचे पालन करून काढला होता. शेतकरी हे चर्चा करण्यासही तयार होते.
मोर्चा संपल्यानंतर अलिबाग पोलिसांनी २५ जणांवर कायद्याचे उल्लंघन केल्याबाबत गुन्हे दाखल केले आहेत. तर जिल्हा प्रशासन तर्फे ३ नोव्हेंबर रोजी संघटनेला १० नोव्हेंबर रोजी चर्चा बैठक लावल्याचे पत्र पाठविले होते. मात्र शेतकऱ्यावर गुन्हे दखल करून दबावतंत्र वापरले जात असल्याचे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. जोपर्यंत दाखल केलेले गुन्हे मागे घेतले जात नाही तोपर्यंत चर्चेला बसणार नाही असे ऍड महेश मोहिते यांनी निवेदनाद्वारे म्हटले आहेत. त्यामुळे शेतकरी आणि प्रशासन यामध्ये होणारी चर्चा झाली नाही.