खोल समुद्रातील मासेमारी १ जूनपासून होणार बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2019 12:09 AM2019-05-17T00:09:32+5:302019-05-17T00:09:51+5:30
समुद्रातील मासेमारी बंदी १ जून ते ३१ जुलै या कालावधीसाठी राहणार आहे.
पेण : मान्सूनच्या आगमनाच्या पूर्वसंध्येला समुद्र खवळलेला राहणार असल्याने शासनाने १ जून २०१९ पासून खोल समुद्रात मासेमारी करण्यास प्रतिबंध घातला आहे. त्या संबंधीचे आदेश किनारपट्टीतील सर्व मच्छीमार बांधवांना पारित केले असून मत्स्य विभागाचे सहाय्यक आयुक्त अभयसिंग शिंदे इनामदार यांनी शासनातर्फे काढलेल्या परिपत्रकात म्हटले आहे. पावसाळी हंगामात समुद्राच्या मासेमारी बंद कालावधीत मासेमारी करताना यांत्रिक मासेमारी नौकेस अपघात झाल्यास त्या मासेमारी नौकेस शासनाकडून कोणतेही नुकसान भरपाई मिळणार नाही, असे सहाय्यक आयुक्तांनी समुद्रातील मासेमारीवरील बंदीचा आदेश काढलेल्या पत्रकात स्पष्ट केले आहे. समुद्रातील मासेमारी बंदी १ जून ते ३१ जुलै या कालावधीसाठी राहणार आहे. १ आॅगस्टपासून समुद्रात मासेमारी करण्यास प्रतिबंध राहणार नसल्याचे वरील आदेशात म्हटले आहे.
मान्सूनच्या आगमनाची सर्वजण आतुरतेने वाटपाहत असतात. यावर्षी मान्सून केरळच्या किनारपट्टीवर ६ जून रोजी दाखल होईल. त्यानंतर ६ दिवसांनी १२ जून रोजी तो महाराष्टÑ राज्यात प्रवेश करेल असे हवामान शास्त्र विभाग व स्कायमेट या संस्थेने हवामानाच्या अंदाजात वर्तविले आहे. त्यामुळे १ जूनपासून समुद्र खवळलेला राहील. ३ जूनला अमावस्येची मोठी उधाण भरती आहे. या कालावधीत नैऋत्य मौसमी वारे प्रचंड वेगाने वाहत असल्याने समुद्रात महाकाय लाटा उसळून समुद्र खवळलेला राहील. त्यामुळे मान्सून हंगामात समुद्रात मुसळधार लाटा आणि वारा यांचा सामना करणे यांत्रिकी मच्छीमार नौकांना अवघड जाते.
या आपत्ती काळात धोक्याची सूचना म्हणून खोल समुद्रात शासनाकडून प्रतिवर्षी मासेमारी बंदीचा आदेश काढला जातो. पावसाळ्याच्या सुरुवातीच्या २ महिन्यात पावसाचा जोर व वादळी वारे यामुळे खोल समुद्रात मासेमारी करणाऱ्या नौका वादळात सापडून अपघातग्रस्त होवू शकतात. त्यासाठी शासनातर्फे खोल समुद्रात मासेमारी करणाऱ्यांवर प्रतिबंध लादला जातो. सागरी किनाºयापासून १२ सागरी मैलापर्यंत खोल समुद्रातील यांत्रिकी नौकाद्वारे मासेमारी करण्यावर बंदी घालण्यात आलेली आहे. ही बंदी यांत्रिक मासेमारी लोकांसाठीच आहे. पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणारे अथवा बिगर यांत्रिकी नौकाद्वारे मासेमारी करणाºया नौकासाठी ही बंदी लागू नाही, असे मत्स्य विभागाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे. मासेमारी बंदीच्या काळात सागरी जलाधी क्षेत्राबाहेर १२ सागरी मैलापर्यंत खोल समुद्रात यांत्रिक नौका मासेमारी करताना आढळल्यास गलबतासह पकडलेले सर्व साहित्य जप्त करण्यात येईल.
तसेच पकडलेल्या गलबताच्या मालकावर कठोर कारवाई सुद्धा करण्यात येईल असे या पत्रकात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे १ जून ते ३१ जुलै असे एकूण ६१ दिवस खोल समुद्रात मासेमारी करण्यावर शासनाने प्रतिबंध लादलेला आहे. १ आॅगस्टपासून ही लादलेली बंदी उठवून पूर्ववत समुद्रात मासेमारी करण्यास प्रारंभ होईल.