- लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : पावसाळ्यात समुद्रामध्ये मासेमारी आणि प्रवासी वाहतुकीला ३१ मे, अशी शेवटची डेडलाइन देण्यात आली आहे. १ जून ते ३१ जुलै या कालावधीपर्यंत हे निर्बंध राहणार असल्याने या कालावधीच मासेमारी आणि प्रवासी वाहतूक करता येणार नाही. त्यामुळे मोठ्या होड्यांसह लहान होड्या समुद्रकिनारी नांगरण्यास सुरु वात झाली आहे. बंदी कालावधीत मच्छीमारांनी मासेमारी केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा, रायगड जिल्ह्याचे सहायक मत्स्य व्यवसाय आयुक्तांनी दिला आहे.रायगड जिल्ह्यामध्ये सुमारे चार हजार ९४३ होड्या आहेत. त्यापैकी तीन हजार ४४४ नौका या यांत्रिकी श्रेणीतील आहेत. पावसाळ्याचा कालावधी सोडला, तर त्या कालावधीत समुद्रामध्ये मोठ्या प्रमाणात मासेमारी केली जाते. त्याचप्रमाणे मांडवा ते गेटवे आॅफ इंडिया, अशी प्रवासी बोटवाहतूकही सुरू असते. जलवाहतुकीच्या माध्यमातून लाखो प्रवासी प्रवास करीत असतात. मांडवा बंदर येथे अद्यापही ब्रेक वॉटर बंधाऱ्याचे काम पूर्ण झालेले नाही. ते काम पूर्ण झाले असते, तर पावसाच्या कालावधीतही प्रवासी वाहतूक सुरू ठेवता आली असती.जून ते जुलै या कालावधीत माशांचा प्रजनन काळ ठरलेला असतो. त्यामुळे या कालावधीत मासेमारी करता येत नाही. त्याचप्रमाणे याच कालावधीत वादळी वाऱ्यासह पावसाची जोरदार शक्यता असते. याच कालावधीत समुद्राला मोठ्या प्रमाणात उधाणही येत असते. त्यामुळे मासेमारी आणि प्रवासी वाहतूक केल्यास अपघात होऊन फार मोठी आपत्ती येण्याची शक्यता असल्याने, मासेमारी आणि प्रवासी वाहतुकीला बंदी घालण्यात येते. मच्छीमारांनी खबरदारी म्हणून आत्तापासूनच आपापल्या होड्या समुद्राच्या किनारी नांगरण्यास सुरु वात केली आहे.
समुद्रात मासेमारी, प्रवासी वाहतुकीला ३१ मे डेडलाइन
By admin | Published: May 28, 2017 2:52 AM