-आविष्कार देसाई
अलिबाग : पर्सेसिन नेट आणि एलईडी मासेमारीमुळे पारंपरिक मासेमारी करणारा मच्छीमार आर्थिक संकटामध्ये सापडला आहे, अशा पद्धतीच्या मासेमारीमुळे पर्यावरणावर दूरगामी परिणाम होणार आहेत. निसर्ग आणि पारंपरिक मच्छीमार जगला पाहिजे, यासाठी कोकणातील कोळी समाज एकवटला जात असून ठिकठिकाणी बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी कुलाबा किल्ला परिसरात सुमारे चार हजार बोटी घेऊन महाकाय सागरी आंदोलन छेडण्यात येणार आहे.पर्सेसिन नेट आणि एलईडी मासेमारीवर पूर्णपणे निर्बंध आणावेत, शेतकऱ्यांना ज्याप्रमाणे कर्जमाफी दिली जाते, त्याचप्रमाणे मासळीचा दुष्काळ जाहीर करून मच्छीमारांना आर्थिक संरक्षण द्यावे. या प्रमुख मागण्यांसाठी प्रशासन आणि सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. मात्र, अपेक्षित दखल घेतली जात नसल्याने मच्छीमारांनी २३ एप्रिल रोजी आंदोलन पुकारले आहे. जय मल्हार कोळी समाज संस्थेच्या नेतृत्त्वाखाली कोकणातील मच्छीमार समाज एकवटणार आहे.आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोकणातील कोळीवाड्यांमध्ये खंडोबाला साक्ष ठेवून आंदोलनाची दिशा ठरवली जात आहे. मच्छीमार समाज आणि मासेमारीवर अवलंबून असणाºयांचा बैठकांना भरभरून प्रतिसाद लाभत आहे.पर्सेसिन नेट आणि एलईडी फिशिंगमुळे मोठ्या प्रमाणात मासेमारी करण्यात येत आहे. त्यामुळे पारंपरिक मच्छीमार पुरता बुडाला आहे. त्याच्या वाट्याला मच्छीच येत नसल्याने तो आर्थिक संकटामध्ये सापडला आहे. पारंपरिक मासेमारी करणाºयांची संख्या सुमारे ६० हजारांच्या आसपास आहे. त्यावरून या आंदोलनाचे गांभीर्य लक्षात येते. यांच्यावर उपासमारीची वेळ येणार असल्याने आंदोलक चांगलेच पेटून उठले आहेत. प्रशासन आणि सरकारने त्यांच्या मागण्या वेळेत न सोडवल्यास आंदोलनाचे विपरीत परिणाम भोगावे लागणार असल्याचे इशारे आंदोलक देत आहेत.ससून डॉकच्या आकडेवारीनुसार फक्त १८४ बोटींना पर्सेसिन नेट फिशिंग करण्याला परवानगी देण्यात आली आहे. मात्र, प्रत्यक्षात शेकडोंच्या संख्येने बोटी पर्सेसिन नेट पद्धतीने मासेमारी करतात, असे जय मल्हार कोळी समाज संस्थेचे अध्यक्ष तथा आंदोलनाला दिशा देणारे गोरखनाथ नवरीकर यांनी सांगितले. एलईडी फिशिंगवर बंदी असतानाही ती जोमात सुरू आहे. त्याच्यावर कठोर कारवाई होत नसल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.चार हजार बोटी सहभागी होणाररायगड जिल्ह्यापुरताच हा प्रश्न केवळ मर्यादित नाही, तर तो संपूर्ण कोकणातील पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाºयांना भेडसावणारा आहे. त्याचप्रमाणे पर्यावरणाचीही हानी होणार आहे. अलिबाग कुलाबा किल्ल्याच्या पाठीमागील समुद्रामध्ये कोकणातील सुमारे चार हजार बोटी या महाकाय सागरी आंदोलनात सहभागी होणार आहेत. २३ एप्रिलच्या आंदोलनाबाबत प्रशासनाला रीतसर पत्र दिले आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन गोरखनाथ नवरीकर यांनी केले.बोटी फोडण्याचा इशारासागरी आंदोलनामध्ये सुमारे चार हजार बोटी सहभागी होणार आहेत. त्यामुळे आंदोलनाची धार अधिक तीव्र झाल्याचे दिसून येते. आंदोलनाच्या दिवशी पर्सेसिन नेट फिशिंग आणि एलईडी फिशिंग करणाºया बोटी समुद्रामध्ये मासेमारी करताना आढळल्यास त्या बोटी समुद्रामध्येच फोडून टाकण्यात येणार आहेत. त्यामुळे आंदोलनाला हिंसक वळण लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.समुद्रामध्ये आंदोलन होणार असल्याने पोलिसांची पंचाईत होण्याची शक्यता आहे. कारण त्यांच्याकडे पुरेशा बोटी नसल्याने कमी संख्येने फौजफाटा घेऊन त्यांना समुद्रामध्ये जावे लागणार आहे. आंदोलकांची संख्याही सुमारे पाच हजारांच्यावर जाऊ शकते, त्यानुसार पोलिसांना बंदोबस्ताचे नियोजन करावे लागणार आहे.पर्यावरणालाही हानीपर्सेसिन नेट फिशिंग आणि एलईडी फिशिंगमुळे मोठ्या माशांबरोबर लहान मासेही पकडले जातात. त्यानंतर जाळ््यातून ते लहान मृत मासे समुद्राच्या पाण्यात फेकले जातात. लहान मासे मारल्यामुळे त्यांच्या पुढील पिढीच्या उत्पतीवर परिणाम होतो, त्यामुळे निसर्गचक्राला धोका पोहोचवला जात आहे. त्याचप्रमाणे मृत मासे समुद्रात फेकल्यामुळे पर्यावरणालाही हानी पोहोचते.