उरण : उरण-पिरवाडी समुद्रातील खडकावर आपटून दर्यासागर ही मच्छीमार बोट रविवारी रात्री बुडाली. या बोटीतील चार खलाशांनी जीव वाचवण्यासाठी पोहत किनारा गाठला.दर्यासागर ही मच्छीमार बोट पेणकडे निघाली होती. रविवारी रात्री १०:३० च्या सुमारास बोटीच्या नाविकाला पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने उरण-पिरवाडी समुद्रातील खडकावर ती जोरात आदळली आणि फुटली. चहुबाजूंनी पाणी भरल्याने बोटीने तळ गाठण्यास सुरुवात झाली. त्यामुळे मच्छीमार बोटीवर असलेल्या सुशांत अशोक पाटील (२१) सचिन नाथा पाटील (४१), दिनेश दिलिप म्हात्रे (२१, तिघेही रा.घोडाबंदर-वडाव, ता.पेण) आणि देविदास म्हात्रे (२३, रा. भाल, पेण) या चार खलाशांनी जीव वाचवण्यासाठी समुद्रात उड्या मारल्या. तासाभराने पोहत त्यांनी उरण-पिरवाडीचा किनारा गाठला. किनाऱ्यावरील स्थानिक नागरिकांनी त्यांना चहा, गरम कपडे दिले. उरण पोलिसांनीही त्यांची चौकशी करून घटनेची खातरजमा केली. त्यानंतर त्यांच्या नातेवाईकांना बोलावून घरी रवाना केल्याची माहिती उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक जगदिश कुलकर्णी यांनी दिली.
उरणमध्ये मच्छीमार बोट बुडाली
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2019 2:11 AM