अलिबाग : पर्सेनेट आणि एलईडी फिशिंगला कायद्याने बंदी असतानाही काही बोटी त्यांचा वापर करून मासेमारी करीत आहेत. त्यांना विरोध केल्यामुळे दोन गटांत सातत्याने संघर्ष उफाळून येत आहे. या प्रकरणी सरकारकडून ठोस कारवाई करण्यात येत नसल्याच्या निषेधार्थ अलिबाग येथील कुलाबा किल्ला समुद्र परिसरामध्ये बोट आंदोलन छेडण्यात येणार असल्याची माहिती रायगड जिल्हा पारंपरिक मच्छीमार संघर्ष समितीचे अध्यक्ष दिलीप भोईर यांनी येथे दिली. आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हा, असे आवाहनही त्यांनी केले.पर्सेनेट आणि एलईडी फिशिंगमुळे निर्माण होणारे संघर्ष रोखण्यासाठी प्रशासनाने कारवाईबाबत अंमलबजावणी करावी. यासाठी आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी अलिबाग येथील विश्रामगृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी भोईर बोलत होते.
पर्सेनेट आणि एलईडी फिशिंग पद्धतीने मासेमारी केल्यामुळे मोठ्या प्रमाणात मासे मिळतात. मात्र या पद्धतीमुळे समुद्रातील माशांच्या प्रजननावर परिणाम होत असल्याने मत्स्यसंपदाच धोक्यात आलेली आहे. त्यामुळे पारंपरिक मासेमारी करणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.काही दिवसांपूर्वी पारंपरिक मासेमारी करणारे आणि एलईडी फिशिंग करणाऱ्यांमध्ये भर समुद्रामध्ये तुफान हाणामारी झाली होती. त्याचप्रमाणे खांदेरी किल्ल्यावरदेखील मोठ्या प्रमाणात वाद झाल्याने सुमारे सात जण जखमी झाले होते. याबाबतच्या परस्परविरोधी तक्रारी विविध पोलीस ठाण्यांत करण्यात आल्या आहेत. सातत्याने असे वाद होत असल्याने पारंपरिक मासेमारी करणाºयांमध्ये कमालीचे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस प्रशासन, जिल्हाधिकारी, मत्स्य विकास अधिकारी यासह अन्य विभागाचे अधिकारी वेळीच हस्तक्षेप करीत नसल्याने संघर्षामध्ये वाढ होत आहे. असे प्रकार वेळीच रोखले नाही, तर भविष्यात फार मोठी किंमत मोजावी लागण्याची शक्यता भोईर यांनी वर्तविली आहे.समुद्रात वाद होण्याचे प्रकार वाढले१पर्सेनेट आणि एलईडी फिशिंगला विरोध करण्यात येत असतानात काहींनी पर्सेनेट फिशिंगला विरोध करू नये, फक्त एलईडी फिशिंगला विरोध करा, असा सूर लावल्याने काही प्रमाणात एकवाक्यता नसल्याचे दिसले.२वास्तविकपणे पर्सेनेट आणि एलईडी फिशिंग करण्याला कायद्यानेच बंदी असल्याने दोन्ही पद्धतीची मासेमारी घातक असल्याचे मत मोतीराम पाटील, धर्मा घारभट यांच्यासह अन्य मच्छीमारांनी व्यक्त केले.३याप्रसंगी संघटनेचे सचिव प्रवीण तांडेल, अनिल भिंगारकर, पांडुरंग आगरकर, गोरक्षवाथ नवरीकर, विश्वास नाखवा यांच्यासह पदाधिकारी आणि कोळी समाजातील नागरिक उपस्थित होते.सातत्याने मागणी करूनही सरकार आणि प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने त्यांचे लक्ष वेधण्यासाठी २ जानेवारी रोजी निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे. अलिबाग कुलाबा किल्ला परिसरामध्ये सुमारे एक हजार बोटी आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत.जपानमध्येही नियम डावलून मोठ्या प्रमाणात मासेमारी करण्यात आल्याने त्यांच्याकडील मत्स्य संपदाच नष्ट झाली होती. त्यामुळे तेथील सरकारला सलग १० वर्षे मासेमारी करण्यावर कडक निर्बंध लावावे लागले होते. भविष्यामध्ये आपल्याकडेही पर्सेनेट आणि एलईडी फिशिंगमुळे अशीच परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. या आंदोलनात पालघर जिल्ह्यातून ५०० बोटी सहभागी होतील.- संजय कोळी,सरचिटणीस, अखिल महाराष्टÑ मच्छीमार कृती समिती, वसई