जिल्ह्यात शेतकऱ्यांपाठोपाठ मच्छीमार संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2019 02:08 AM2019-11-06T02:08:21+5:302019-11-06T02:08:45+5:30

उपजीविके चा प्रश्न गंभीर; चिंता वाढली

Fishermen in crisis after farmers in the district | जिल्ह्यात शेतकऱ्यांपाठोपाठ मच्छीमार संकटात

जिल्ह्यात शेतकऱ्यांपाठोपाठ मच्छीमार संकटात

Next

संतोष सापते 

श्रीवर्धन : कोकणातील मुख्य व्यवसाय असलेल्या मच्छीमारीला ‘क्यार’ वादळाचा मोठा फटका बसला आहे. शेतक ऱ्यांविषयी सरकारने संवेदनशीलता दर्शवत तत्काळ नुकसानभरपाई देण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा कामास लावली आहे. मात्र, कोकणातील हजारो मच्छीमार व्यावसायिकांकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. रायगड जिल्ह्यात कोळी समाजाव्यतिरिक्त मुस्लीम, भंडारी, मराठा या समाजातील लोकही मासेमारीशी निगडित व्यवसाय करतात. वाहतूक, बोट बांधणी, मासेमारीसाठी आवश्यक बाबी यांचा व्यापार नारळी पौर्णिमेनंतर जोरात असतो. नोव्हेंबर-डिसेंबर हा मासेमारीसाठी सुगीचा कालावधी मानला जातो.
‘क्यार’चे दुरगामी परिणाम मासेमारीवर झाले आहेत. समुद्रातील वादळाचा धोका पत्करत मासेमारी करणे अवघड झाले आहे. हवामानात अचानक बदल होत आहेत, सकाळी धुक्याचे प्रमाण वाढले आहे. आकाशात कधी लख्ख सूर्यप्रकाश असतो तर कधी मळभ दाटून येते. मेघगर्जना तर कधी विजांचा खेळ सुरू होतो.

जोरदार वारे हे मच्छीमारांच्या दृष्टीने सगळ्यात आव्हानात्मक बाब ठरत आहे. समुद्राच्या भरती-ओहटीविषयी मच्छीमार सजग असतो; परंतु हवामान बदलामुळे समुद्रात निर्माण होणाºया वादळी वाºयाने हैराण झाला आहे. समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे निर्माण झालेल्या वादळाने मासेमारीसाठी लोकांना समुद्रात दूरवर जावे लागत आहे.
अगोदर पाच ते आठ वावपर्यंत मासेमारी करताना सहज मासे मिळत होते; परंतु आज दहा वावच्या पुढे जाऊन मच्छीमारी करावी लागत आहे. त्यामुळे निश्चितच मच्छीमारांच्या समस्या वाढल्या आहेत.
श्रीवर्धन व म्हसळा तालुक्यात दिघी, श्रीवर्धन, शेखार्डी, जीवना, आदगाव, सर्वा, हरवीत, रोहिणी, तुरुबाडी, वाशी या ठिकाणी मासेमारी केली जाते. आज दोन्ही तालुक्यांतील अनेक बोटी किनाºयावर नांगरण्यात आल्या आहेत. जीवितास धोका व उत्पन्नाची हमी नसणे, या दोन्ही बाबी मासेमारी करणाºयांसाठी आव्हानात्मक ठरत आहेत.

मदतीची कोळी बांधवांची मागणी
कोकणातील सर्वात मोठा मानला गेलेला कोळी समाज हा आजही मुखत्वे मासेमारीवर अवलंबून आहे. उत्पन्नाचे दुसरे साधन नाही त्यामुळे सर्व उपजीविका ही मासेमारीवर चालते. अनेक वर्षांचा पूर्वापार चालत आलेला व्यवयाय म्हणून कोळी समाज मासेमारीकडे बघतो.

समाजातील शिक्षणाचे प्रमाण अतिशय नगण्य आहे, त्यामुळे मासेमारी या व्यवसायाला प्राधान्य दिले जाते. गेल्या वर्षीपासून हवामानातील बदल मासेमारी व्यवसायासाठी धोकादायक ठरू लागला आहे. तितली, क्यार व आता ‘महा’ वादळ मासेमारी करणाºया लोकांना देशोधडीला लावत आहे.

तर दुसरीकडे कोकणात येणारे रासायनिक प्रकल्प मासेमारी संपुष्टात आणण्यासाठी टपलेले आहेत. कोळी समाजाची श्रीवर्धन, म्हसळा तालुक्यांतील लोकसंख्या अंदाजे २२ हजारांच्या जवळपास आहे. शेतकºयांबरोबर मासेमारी करणाºया लोकांना सरकारकडून मदत मिळावी, ही अपेक्षा कोळी बांधव व्यक्त करत आहेत.

समुद्रातील वादळाने मासेमारी अवघड झाली आहे, मासे लवकर मिळत नाहीत. अगोदर १ ते २ तासांत मासे मिळत होते. आता पाच ते सहा तास दूर गेल्यावर मासे मिळतात. मात्र, त्याचे प्रमाण अतिशय कमी आहे. सर्व लोकांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
- हरिदास वाघे, मच्छीमार, श्रीवर्धन

श्रीवर्धन तालुक्यातील अनेक कुटुंबे मासेमारीवर अवलंबून आहेत. निसर्गाचा कोप मासेमारीसाठी घातक ठरत आहे. त्याचा परिणाम उत्पन्नावर होत आहे. लहान बोटी पाण्यात चालवणे अवघड झाले आहे. वातावरण केव्हा बदलेल ते सांगणे कठीण आहे. सरकारने मासेमारीवर अवलंबून असणाºया लोकांना मदत करावी ही अपेक्षा आहे.
- जुनेद दुस्ते,
मच्छीमार, श्रीवर्धन

आम्ही हजारो रुपये गुंतवणूक करून मासेमारी व्यवसायाला प्रत्येक वर्षी सुरुवात करतो. गेल्या वर्षीपासून समुद्रातील विविध वादळांनी धंद्याची पुरती वाट लावली आहे. धंद्यात गुंतवलेले पैसे परत मिळण्याची शक्यता कमी आहे.
- मोहन वाघे,
मच्छीमार, जीवना

मासेमारी व्यवसायाला वादळाचा फटका बसला आहे, मासे मिळत नाहीत, खलाशी व इतरांचे पगार देणे अवघड झाले आहे. त्यात डिझेलचे दर वाढलेले आहेत. सरकारने मासेमारीचा दुष्काळ जाहीर करून आम्हाला शेतकºयांप्रमाणे मदत करावी.
- चंद्रकांत वाघे,
व्यावसायिक, जीवना
 

Web Title: Fishermen in crisis after farmers in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.