पर्सेसीनविरोधात एकवटले मच्छीमार, सागरी आंदोलन छेडणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 12:30 AM2018-04-20T00:30:53+5:302018-04-20T00:30:53+5:30
पर्सेसिन नेट आणि एलईडी मासेमारीमुळे पारंपरिक मासेमारी करणारा मच्छीमार आर्थिक संकटामध्ये सापडला आहे, अशा पद्धतीच्या मासेमारीमुळे पर्यावरणावर दूरगामी परिणाम होणार आहेत.
- आविष्कार देसाई
अलिबाग : पर्सेसिन नेट आणि एलईडी मासेमारीमुळे पारंपरिक मासेमारी करणारा मच्छीमार आर्थिक संकटामध्ये सापडला आहे, अशा पद्धतीच्या मासेमारीमुळे पर्यावरणावर दूरगामी परिणाम होणार आहेत. निसर्ग आणि पारंपरिक मच्छीमार जगला पाहिजे, यासाठी कोकणातील कोळी समाज एकवटला जात असून ठिकठिकाणी बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी कुलाबा किल्ला परिसरात सुमारे चार हजार बोटी घेऊन महाकाय सागरी आंदोलन छेडण्यात येणार आहे.
पर्सेसिन नेट आणि एलईडी मासेमारीवर पूर्णपणे निर्बंध आणावेत, शेतकऱ्यांना ज्याप्रमाणे कर्जमाफी दिली जाते, त्याचप्रमाणे मासळीचा दुष्काळ जाहीर करून मच्छीमारांना आर्थिक संरक्षण द्यावे. या प्रमुख मागण्यांसाठी प्रशासन आणि सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. मात्र, अपेक्षित दखल घेतली जात नसल्याने मच्छीमारांनी २३ एप्रिल रोजी आंदोलन पुकारले आहे. जय मल्हार कोळी समाज संस्थेच्या नेतृत्त्वाखाली कोकणातील मच्छीमार समाज एकवटणार आहे.
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोकणातील कोळीवाड्यांमध्ये खंडोबाला साक्ष ठेवून आंदोलनाची दिशा ठरवली जात आहे. मच्छीमार समाज आणि मासेमारीवर अवलंबून असणाºयांचा बैठकांना भरभरून प्रतिसाद लाभत आहे.
चार हजार बोटी सहभागी होणार
रायगड जिल्ह्यापुरताच हा प्रश्न केवळ मर्यादित नाही, तर तो संपूर्ण कोकणातील पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाºयांना भेडसावणारा आहे. त्याचप्रमाणे पर्यावरणाचीही हानी होणार आहे. अलिबाग कुलाबा किल्ल्याच्या पाठीमागील समुद्रामध्ये कोकणातील सुमारे चार हजार बोटी या महाकाय सागरी आंदोलनात सहभागी होणार आहेत. २३ एप्रिलच्या आंदोलनाबाबत प्रशासनाला रीतसर पत्र दिले आहे.
बोटी फोडण्याचा इशारा
सागरी आंदोलनामध्ये सुमारे चार हजार बोटी सहभागी होणार आहेत. त्यामुळे आंदोलनाची धार अधिक तीव्र झाल्याचे दिसून येते. आंदोलनाच्या दिवशी पर्सेसिन नेट फिशिंग आणि एलईडी फिशिंग करणाºया बोटी समुद्रामध्ये मासेमारी करताना आढळल्यास त्या बोटी समुद्रामध्येच फोडून टाकण्यात येणार आहेत.