Cyclone Nisarga: निसर्ग चक्रीवादळात मच्छीमारांचे एक कोटीचे झाले नुकसान; मच्छीमारांमध्ये असंतोष
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2020 02:24 AM2020-07-03T02:24:35+5:302020-07-03T02:24:58+5:30
पुरेसा निधी नसल्याने मदत वाटप रखडले
आविष्कार देसाई
रायगड : जिल्ह्यातील निसर्ग चक्रीवादळात मासेमारी करणाऱ्यांचे सुमारे एक कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र, सरकारने अद्याप नुकसानभरपाईसाठी पुरेसा निधी दिलेला नाही. त्यामुळे मदत वाटप रखडल्याने मच्छीमारांमध्ये असंतोष खदखदत आहे.
३ जून रोजी झालेल्या निसर्ग चक्रीवादळाने रायगड जिल्ह्यातील सव्वा लाख घरांचे नुकसान केले, तर हजारो हेक्टरवरील बागायतींचे क्षेत्र नष्ट झाले. काही तासांच्या वादळाने होत्याचे नव्हते केले. निसर्ग चक्रीवादळाचा फटका हा समुद्रकिनारी असणाºया तालुक्यांना बसला आहे. त्यामुळे येथील मासेमारी करणाºया समाजातील होड्या, मासेमारीच्या जाळ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. प्रामुख्याने श्रीवर्धन, म्हसळा, रोहा, मुरुड, तळा, अलिबाग, पेण, कर्जत आणि उरण तालुक्यातील सात हजार ९६ होड्यांचे अंशत: तर ३० होड्यांचे पूर्णत: असे एकूण ७,१२६ होड्यांचे नुकसान झाले आहे. ६१ जाळ्यांचे अंशत: आणि आठ जाळ्यांचे पूर्णत: नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यात मोठ्या संख्येने शेततळी आहेत. ६३.८० हेक्टरवरील मत्स्य खाद्य खराब झाले, तर ३.६० हेक्टर क्षेत्रातील शेततळ्यांची बांधबंदिस्ती तुटली आहे.
सरकारने तातडीने मासेमारी करणाºया समाजाला नुकसानभरपाई देणे गरजेचे आहे. पावसाळ्याच्या कालावधीतच आम्ही आमच्या होड्यांची डागडुजी करत असतो, तसेच जाळी विणण्याचेही काम याच कालावधीत केले जाते. त्यामुळे आॅगस्ट महिन्यामध्ये पुन्हा नव्या जोमाने मासेमारी करायला जाता येईल. गेल्या काही वर्षांपासून मासळीचा दुष्काळ पडत आहे. गेल्या आणि आताच्या वर्षात किमान नऊ वादळे येऊन गेली; मात्र आम्हाला कोणीच मदत केली नाही. निसर्ग वादळाने अन्य विभागांचे नुकसान झाल्याने त्यांना तातडीने मदत देण्यात येत आहे. मात्र आम्हाला मागे ठेवले जाते. आता तरी सरकारने मदत देणे गरजेचे आहे, असे मांडवा येथील माता टाका देवी मच्छीमार सोसायटीचे अध्यक्ष अनिल भिंगारकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
मासेमारी करणाऱ्यांच्या होड्या, जाळ्यांसह अन्य नुकसान झाले आहे. पंचनामे पूर्ण झाले आहेत. प्रशासनाकडे सध्या ५० टक्केच निधी आहे. उर्वरित रक्कम लवकरच प्राप्त होईल. मदत वाटप करण्याचे काम सुरू आहे. जिल्हा प्रशासनाला २० लाख रुपये प्राप्त झाले होते, त्यापैकी १८ लाखांचे वाटप करण्यात आले आहे. - पद्मश्री बैनाडे, निवासी उपजिल्हाधिकारी, रायगड
९६ लाख ६० हजार ३६४ रुपयांचे पंचनामे पूर्ण
मत्स्य विकास विभागाने ९६ लाख ६० हजार ३६४ रुपयांचे नुकसान झाल्याबाबत पंचनामे पूर्ण केले आहेत. मात्र, नुकसानभरपाईची रक्कम जिल्हा प्रशासनाकडे नसल्याने मदत वाटप रखडले असल्याचे बोलले जाते. जुन्या सरकारी निर्णयानुसार अंशत: नुकसान झालेल्या एका होडीला चार हजार रुपये, तर पर्ू्णत: नुकसान झालेल्या होडीसाठी नऊ हजार ६०० रुपये सरकारने मंजूर केले होते.
तसेच अंशत: जाळ्याच्या नुकसानीसाठी दोन हजार १०० तर पूर्णत:साठी दोन हजार ६०० रुपये नुकसानभरपाईची रक्कम आहे. मात्र आता नवीन निर्णयानुसार अंशत: नुकसान झालेल्या एका होडीला १० हजार रुपये तर पूर्णत: नुकसान झालेल्या होडीला २५ हजार रुपये मिळणार आहेत. तसेच अंशत: जाळीला पाच हजार आणि पूर्णत: तुटलेल्या एका जाळीलाही पाच हजार रुपये नुकसानभरपाई देण्यात येणार आहे.