मुरुड जंजिरा : मुरुड तालुक्यात निसर्ग चक्रीवादळामुळे शेकडो बोटींचे नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहाणी करून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मच्छीमारांना मोठे अर्थसाहाय्य मिळेल, असे आश्वासन दिले होते, परंतु प्रत्यक्षात मुरुड तालुक्यासाठी सहा लाख ११ हजार ही तुटपुंजी मदत तहसील कार्यालयात प्राप्त झाली आहे. त्यामुळे आमच्या कोळी समाजातील होडी मालकांना कमी पैसे प्राप्त होणार असून, कोळी समाज नाराज झाला असल्याचे प्रतिपादन रायगड जिल्हा मच्छीमार संघाचे उपाध्यक्ष मनोहर बैले यांनी केले आहे.एका बोटीचे मालकालाही खूपच अल्प पैसे मिळणार आहेत. त्यातून दुरुस्तीचा खर्च अशक्यच असल्यामुळे १ आॅगस्ट रोजी कायदेशीर मच्छीमारी सुरू झाल्यावर मच्छीमार बोट समुद्रात कशी न्यायची, हा मोठा प्रश्न मच्छीमारांसमोर निर्माण झाला आहे. याबाबत सहायक मच्छीमार विकास व परवाना अधिकारी तुषार वाळुंज यांनी सांगितले की, मुरुड तालुक्याला प्राप्त झालेली रक्कम कमी असून, याबाबत आम्ही जिल्हाधिकारी यांना लेखी पत्रव्यवहार केला असून, वाढीव रकमेची मागणी केली आहे. सदरची वाढीव रक्कम प्राप्त होताच, ती वाटप करण्यात येईल. त्याचप्रमाणे, आम्ही केलेले पंचनामे तहसील कार्यालयास जमा केल्याची माहिती त्यांनी दिली.अल्प पैसे मिळणारएका बोटीचे कमीतकमी २५ हजारांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. मग जर कमी पैसे आले असतील, तर बोट मालकालाही खूपच अल्प पैसे मिळणार आहेत.
तुटपुंज्या मदतीने मच्छीमार नाराज, मुरुड तालुक्यात बोट दुरुस्तीच्या रकमेसाठी पुन्हा पत्रव्यवहार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2020 12:21 AM