मच्छिमारांच्या मोर्चाने मुंबई दणाणली

By admin | Published: March 17, 2016 11:21 PM2016-03-17T23:21:46+5:302016-03-17T23:34:04+5:30

पारंपरिक मच्छिमार एकवटले : पर्ससीन नेट ट्रॉलर्सवर संपूर्ण बंदीची मागणी

Fishermen's fare by the Mumbai Metropolitan Region | मच्छिमारांच्या मोर्चाने मुंबई दणाणली

मच्छिमारांच्या मोर्चाने मुंबई दणाणली

Next

रत्नागिरी : पर्ससीन नेट ट्रॉलर्सवर संपूर्ण बंदी आणण्यासाठी सुमारे १५ हजार पारंपरिक व छोट्या मच्छिमारांनी मुंबईतील गिरगाव चौपाटीवरून आझाद मैदानावर गुरुवारी प्रचंड मोर्चा काढला. या मोर्चामध्ये पर्ससीन नेटवर बंदी घालण्याच्या महिला व मच्छिमारांच्या घोषणेने आझाद मैदान दणाणले होते.
हा प्रचंड मोर्चा पर्ससीन नेट ट्रॉलर्सविरोधी संघर्ष समिती आणि अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीने संयुक्तपणे काढला. पर्ससीन नेट ट्रॉलर्सना एका आठवड्यात परवाने देण्याची घोषणा मत्स्यव्यवसायमंत्री एकनाथ खडसे यांनी विधानसभेत जाहीर केली होती. या घोषणेचा निषेध करण्यासाठी पारंपरिक व छोट्या मच्छिमारांच्या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
पर्ससीन नेट ट्रॉलर्सचे सर्व परवाने रद्द करावेत, पर्ससीन नेटला राज्यात बंदीचा कायदा करावा, ओएनजीसी कंपनीने जानेवारी २०१५ ते ३१ मे २०१५पर्यंत सर्व्हेमुळे पालघर, ठाणे व मुंबईतील मच्छिमारांना ५०० कोटी रुपये नुकसानभरपाई या कंपनीकडून मिळावी, चित्रा व खलिजा टक्करीमुळे ८ कोटी ३५ लाख रुपये कोळी महिलांना व मच्छिमारांना मिळावेत, मुंबईतील १०० मासळी बाजारांमध्ये सर्व प्रकारच्या सोयीसुविधा ताबडतोब देण्यात याव्या, मुंबईच्या कोस्टल रोडमुळे एकाही कोळीवाड्याची घरे व बंदराला धोका निर्माण होता कामा नये, कफपरेड समुद्रात ४२ एकर भराव टाकून शिवस्मारकामुळे २५ हजार मच्छिमारांचा व्यवसाय धोक्यात आला आहे, त्यामुळे हे शिवस्मारक बांद्रा बॅण्ड स्टॅण्ड समोरील समुद्रातील खडकाळ जागेवर बांधण्यात यावे, या प्रमुख मागण्या मोर्चातील पारंपरिक मच्छिमारांच्या होत्या.
या मोर्चात सहभागी होण्यासाठी पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी व मुंबईतील सर्व मच्छिमारांनी नौका बंद ठेवल्या होत्या. त्यामुळे गुरुवारी मच्छिमार महिला व पुरुष या मोर्चामध्ये सुमारे १५ हजारांच्या संख्येने सहभागी झाले होते. या मोर्चाचे नेतृत्व अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे अध्यक्ष दामोदर तांडेल, कार्याध्यक्ष बर्नाड डिमेलो, सरचिटणीस संजय कोळी, उपाध्यक्ष अशोक अंभिरे, रवी म्हात्रे, मोहन बावरे, दिलीप माठक, हरेश भानजी, देवेंद्र तांडेल यांनी केले. (शहर वार्ताहर)


५समुद्रातून हुसकावण्याचे षड्यंत्र
परप्रांतीय व पर्ससीन नेट ट्रॉलर्सवाल्यांनी पारंपरिक मच्छिमारांचा व्यवसाय नष्ट केला आहे. तसेच शेकडो वर्षांपासून मासेमारी करणाऱ्या गरीब कष्टकरी पारंपरिक मच्छिमारांना समुद्रातून हुसकावून लावण्याचे षङयंत्र रचले जात असल्याचा आरोप या मोर्चामध्ये मच्छिमारांनी केला.

Web Title: Fishermen's fare by the Mumbai Metropolitan Region

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.