अलिबाग : पर्सेसिन नेट आणि एलईडी फिशिंग करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांनी येथे बैठकीत दिले. त्यामुळे मच्छीमार समाजाने २३ एप्रिल रोजी पुकारलेले सागरी आंदोलन स्थगित केले आहे. सात दिवसांत ठोस कारवाई न झाल्यास पुन्हा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा मच्छीमार समाजाचे ज्येष्ठ नेते गोरक्ष नवरीकर यांनी दिला.जिल्हाधिकारी सूर्यवंशी यांनी संबंधित यंत्रणांना कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. ‘पर्सेसिन विरोधात एकवटले मच्छीमार’ या मथळ््याखाली ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केले होते. मच्छीमारांच्या न्याय हक्कासाठी कुलाबा किल्ल्याच्या मागील समुद्रामध्ये सुमारे चार हजार बोटी महाकाय सागरी आंदोलन छेडून पर्सेसिन नेट आणि एलईडी फिशिंग करणाºया बोटी फोडून टाकण्याचा इशारा आंदोलकांनी दिला होता. आंदोलनाची गंभीरता लक्षात घेत, जिल्हाधिकारी सूर्यवंशी यांनी शुक्रवारी तातडीने बैठक बोलावली. या बैठकीला कोस्टगार्डचे कमांडंट अरुणकुमार सिंग, सहायक आयुक्त मत्स्य व्यवसाय अविनाश नाखवा, जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर, तहसीलदार प्रकाश सकपाळ आदी उपस्थित होते.पर्सेसिन नेट फिशिंग आणि एलईडी फिशिंगमुळे कोकणातील सुमारे ५० हजार मच्छीमारांवर आर्थिक संकट ओढवले आहे.या विरोधात सातत्याने प्रशासन आणि सरकार यांच्याकडे पाठपुरावा करूनही ठोस कारवाई करण्यात येत नसल्याने मच्छीमार समाज प्रचंड संतप्त झाला होता. त्यामुळे त्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. यासाठी जिल्हा, तालुका आणि गावस्तरावर बैठकांचे सत्र सुरू केले होते.
मच्छीमारांचे सागरी आंदोलन स्थगित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 2:59 AM