उरण : १ जूनपासून शासनाच्या खोल समुद्रातील ६० दिवसांच्या पावसाळी मासेमारी बंदीच्या आदेशानंतर १ आॅगस्टपासून मासेमारीला सुरुवात होणार आहे. फक्त १२ दिवसांचाच अवधी उरल्याने पर्सियन नेट फिशिंग आणि खोल समुद्रातील मासेमारी या दोन्ही प्रकारातील सुरू होणाऱ्या मासेमारीसाठी करंजा-मोरा-कसारा, ससूनडॉक बंदरात मच्छीमारांची मोठ्या प्रमाणात लगबग सुरू झाली आहे.
खोल समुद्रातील मासेमारी ५० ते ७० वाव खोलीपर्यंत केली आहे. परिसरात मासेमारी खोल समुद्रातील आणि पर्सियन फिशिंग या दोन प्रकारात मोठ्या प्रमाणात केली जाते.आॅगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासूनच खवळलेला समुद्र शांत होतो. नीरव शांत झालेल्या सागरात पर्सियन नेट फिशिंगसाठी विशेषत: नारळी पौर्णिमेनंतर पोषक वातावरण असते. समुद्राच्या भूपृष्ठावरील ४ ते ५ कि.मी. परिघातील परिसरात ३५ ते ४० वाव खोलीपर्यंत पर्सियन नेट फिशिंग केली जाते. याआधी पर्सियन नेट फिशिंग १५ ते २० वाव खोल समुद्रापर्यंत केली जात होती.मात्र समुद्र किनाºयावरील वाढत्या प्रदूषणामुळे १५ ते २० वाव खोलीपर्यंत मासळी सध्या मिळेनाशी झाली आहे. परिणामी पर्सियन नेट फिशिंगसाठी ३५ ते ५० वाव खोल समुद्रापर्यंत मच्छीमारांना जावे लागते. यामुळे जाळीची उंची बरोबरच जाळीला वजनासाठी बांधण्यात येणाºया शिशाच्या वजनी गोळ्यातही वाढ करावी लागत आहे. पर्सियन फिशिंगसाठी शासनाकडून सप्टेंबर महिन्यापासूनच सुरुवात करण्यास परवानगी असली तरी हि मासेमारी आॅगस्ट महिन्यापासूनच केली जाते.
पर्सियन नेट आणि खोल समुद्रातील मासेमारी करणारे मच्छीमार मासेमारीसाठी १आॅगस्टसाठी सज्ज झाले आहेत. त्यामुळे करंजा-मोरा-कसारा,ससूनडॉक बंदरात हजारो मच्छीमारांची आणि मच्छीमार ट्रॉलर्सची मासेमारीच्या पूर्वतयारीसाठी गर्दी झाली आहे. मच्छीमारांची बोटींच्या डागडुजी, रंगरंगोटी आणि इतर तत्सम कामांची विविध बंदरात लगबग सुरु आहे. १ आॅगस्टपासून डिझेल उपलब्ध होण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे डिझेल भरण्यासाठी मच्छीमार बोटींची कसारा आणि ससूनडॉक बंदरात गर्दी उसळणार आहे. डिझेल, आवश्यक साधन-सामुग्री उपलब्ध होताच मच्छीमार बोटी मासेमारीसाठी रवाना होणार असल्याची माहिती करंजा मच्छीमार संस्थेचे अध्यक्ष शिवदास नाखवा यांनी दिली.