अलिबाग : अलिबाग कोळीवाडा येथील मच्छीमार रणजित खमिस याच्या मालकीची समुद्रात मच्छीमारी साठी गेलेली बोट गुरुवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास बुडाल्याची घटना घडली आहे. या बोटीवर चार जण होते. यापैकी एक जण बेपत्ता असून तीन जण सुखरूप आहेत. जब्बार निषाद असे बेपत्ता असलेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्याचा शोध घेतला जात आहे. या दुर्घटनेत बोट समुद्राच्या तळाला गेली असल्याने बोट मालकाचे लाखोचे नुकसान झाले आहे.
रणजित खमिस याच्या चार मच्छिमार बोटी आहेत. यापैकी अन्नपूर्णा लक्ष्मी बोट बुधवारी सकाळी दहा वाजता दोन दिवसासाठी मच्छीमारीसाठी अलिबाग पक्तिवरून निघाली होती. आशिष निषाद (तांडेल) राहुल निषाद,जब्बार निषाद आणि अजून एक जण असे चारजण बोटीत होते. तर त्याच्या सोबत इतर मच्छीमार बोटीही मच्छीमारी साठी गेल्या होत्या. अलिबाग वरून कुलाबा किल्याच्या पुढे कोर्लई भागात मच्छिमारांची मच्छीमारी सुरू होती. पहाटे चार वाजण्याच्या सुमारास अचानक बोटीत पाणी घुसल्याने बोट बुडू लागली.
बोट बुडत असल्याचे पाहून आतील तांडेल आणि खलाशी हे घाबरले आणि त्यांनी समुद्रात उड्या मारल्या. त्याचवेळी त्याच्या सोबत असलेल्या इतर बोटिमधील खलाशी यांनी आपल्या जवळील जीवसुरक्षा साहित्य टाकून आशिष निषाद (तांडेल) राहुल निषाद आणि एक जण या तीन जणांना वाचविण्यात यश आले. तर जब्बार निषाद यालाही वाचविण्याचा प्रयत्न सुरू होता. मात्र काळोख आणि पडलेले धुके यामुळे शोध कार्यात अडचण आली. त्यानंतर सूर्योदय झाल्यानंतरही स्थानिक मच्छीमार यांनी जब्बार याला शोधण्याचा प्रयत्न केला मात्र शोध लागलेला नाही आहे.
बोट दुर्घटनेबाबत अलिबाग मच्छीमार सोसायटी पदाधिकारी यांच्यासह मालक रणजित खमीस यांनी अलिबाग पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदविली. अलिबाग पोलिसांनी बेपत्ता म्हणून नोंद केली आहे. या दुर्घटनेत तीन जण सुखरूप वाचले असले तरी एकासह बोटीलाही जलसमाधी मिळाली आहे.