मुरुडमधील मच्छीमारांच्या होड्या किनाऱ्याला; लॉकडाऊनमुळे मासळी खरेदी-विक्री झाली बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 11:46 PM2021-04-30T23:46:05+5:302021-04-30T23:46:09+5:30
लॉकडाऊनमुळे मासळी खरेदी-विक्री झाली बंद; पावसाळ्यापूर्वीच्या कामांना आला वेग
मुरुड : कोरोना महामारीच्या संकटातील दुसऱ्या लाटेने सर्वांनाच त्रस्त केले आहे. लॉकडाऊनमुळे मासेविक्रीत मोठी घट झाली आहे. सध्या डिझेल खर्चही निघत नाही, हॉटेल व्यवसाय बंद, मुंबई मार्केट बंद त्यामुळे ग्राहकच नसल्याने मासेमारी करून काय करायचे, या विवंचनेत प्रचंड आर्थिक नुकसान सोसून यावर्षी सुमारे वीस, पंचवीस दिवस आधीच मच्छीमारांनी होड्या किनारी लावून पावसाळ्याआधीच्या कामांची लगबग सुरू केली आहे.
शासनाच्या आदेशाने पावसाळ्यात खोल समुद्रातील मासेमारी बंद ठेवावी लागते. त्या अनुषंगाने मुरुडमधील कोळी बांधव आपल्या होड्या साधारण १५ मेपासून किनाऱ्यावर लावतात, त्यानंतर होडीची साफसफाई, होडीतील सर्व जाळ्या स्वच्छ धुवून आपल्या घरी नेऊन ठेवतात. नंतर पाऊस सुरू होण्याआधी होड्या शाकारण्यात येतात. परंतु यावर्षी राज्य शासनाने १५ मेपर्यंत लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे मुंबईतील मोठ-मोठ्या मासळी मार्केटमधून मासळी खरेदी-विक्रीचा व्यवहार होतो.
ती सध्या बंद करण्यात आली आहे. त्यामुळे खोल समुद्रातून पकडलेली मासळी याची विक्रीसुद्धा होत नाही. त्यामुळे अखेर कंटाळून मच्छिमार पुन्हा एकदा आपल्या गावी परतले असून, समुद्र किनारी बोटी लवकरच शाकारून उन्हाळ्यापूर्वी कामाची सुरुवात सुद्धा केली आहे. १ जून ते २० जुलैपर्यंत मासेमारी करता येत नाही. साधारणत: सर्व बोटी या किमान २० मेपर्यंत किनाऱ्याला शाकारण्यात येतात. परंतु यंदा मात्र लॉकडाऊन १५ मे पर्यंत गेल्याने व पुढेसुद्धा हा लॉकडाऊन वाढेल, या भीतीपोटी सर्व मच्छिमार अगोदरच समुद्र किनारा गाठून बोटींच्या दुरुस्ती अथवा मशीनची देखभाल, जाळी स्वच्छ धुऊन उन्हात सुकत घालणे आदी स्वरूपाच्या कामात व्यस्त झालेला दिसत आहे.