वादळी पावसामुळे मासेमारी पुन्हा ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2020 01:40 AM2020-08-17T01:40:35+5:302020-08-17T01:40:38+5:30
मुरुड, एकदरा, बोर्ली, कोर्लेई, राजपुरी आदी ठिकाणच्या नौका आपापल्या किनाºयावर परतल्याची माहिती रायगड मच्छीमार संघांचे उपाध्यक्ष मनोहर बैले यांनी ‘लोकमत’ला दिली.
आगरदांडा : रायगड जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडत असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. वादळी पावसामुळे सुरू झालेली मासेमारी पुन्हा ठप्प झाली असून, मुरुड, एकदरा, बोर्ली, कोर्लेई, राजपुरी आदी ठिकाणच्या नौका आपापल्या किनाºयावर परतल्याची माहिती रायगड मच्छीमार संघांचे उपाध्यक्ष मनोहर बैले यांनी ‘लोकमत’ला दिली.
वादळी हवामानामुळे २० आॅगस्टपर्यंत मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, असा इशारा मेरिटाइम बोर्डाने दिला असल्याचे बैले यांनी सांगितले. आगरदांडा बंदरात हर्णे, रत्नागिरीसह रायगड जिल्ह्यातील नौका नांगरण्यात आल्या आहेत. ही संख्या सुमारे १०० असून, खलाशी कर्मचाऱ्यांची मोठी कुचंबणा होण्याची शक्यता दिसून येत आहे. १ आॅगस्टला मच्छीमारी सुरू झाली. मात्र, हा उत्साह फार टिकला नाही. ६ आॅगस्टपासून वादळी वारे वाहत असल्याने, सर्व तयारी करून मासेमारीस गेलेल्या नौका पुन्हा परतल्या. यामुळे मच्छीमारांचे मोठे नुकसान झाले. मासेमारी बंद पडल्याने मार्केटमध्ये मासळीचा मोठा तुटवडा असून, खाडीतील छोट्या मासळीचे भाव कडाडले असल्याचे दिसून आले.
मच्छीमारांचा २०१७चा डिझेल परतावा अद्याप शासनाकडून आलेला नसल्याचे मनोहर बैले यांनी स्पष्ट केले. त्यामुळे गणेशोत्सव कसा साजरा करावा, असा प्रश्न मच्छीमारांना पडला आहे.
मदत मिळाली नाही
निसर्ग वादळात झालेल्या नुकसानीपोटी मेरिटाइम बोर्डाकडून नौका मालकाला प्रत्येकी फक्त ४,१०० इतकीच मदत आली असून, त्या व्यतिरिक्त काहीही आर्थिक मदत आली नसल्याचे मनोहर बैले यांनी स्पष्ट केले. कोरोनामुळे श्रीवर्धन, मुरुड, अलिबाग, तालुक्यातील पर्यटन व्यवसाय पूर्णत: बंद पडला असून, छोटे व्यावसायिक मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. या भागातील निसर्ग आणि मासळी खाण्यासाठी दरवर्षी पावसाळ्यात पर्यटक येत असतात, परंतु यंदा पर्यटक नाहीत, मासळीही नाही.