१ आॅगस्टपासून मासेमारी सुरू !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 02:39 AM2017-07-18T02:39:05+5:302017-07-18T02:39:05+5:30
१ जूनपासून शासनाच्या खोल समुद्रातील पावसाळी मासेमारीवरील बंदीनंतर १ आॅगस्टपासून मासेमारीला सुरुवात होणार आहे. त्यामुळे करंजा- मोरा, कसारा, ससून डॉक
- लोकमत न्यूज नेटवर्क
उरण : १ जूनपासून शासनाच्या खोल समुद्रातील पावसाळी मासेमारीवरील बंदीनंतर १ आॅगस्टपासून मासेमारीला सुरुवात होणार आहे. त्यामुळे करंजा- मोरा, कसारा, ससून डॉक बंदरात मच्छीमारांची लगबग सुरू झाली आहे.
१ आॅगस्टपासून खोल समुद्रातील मासेमारीसाठी मोरा - करंजा बंदरात शेकडो मच्छीमारी ट्रॉलर्स सज्ज झाले आहेत. मासेमारीसाठी मच्छीमारांना ५० ते ७० वाव खोल समुद्रात जावे लागते. त्यासाठी एका ट्रिपसाठी १० ते
१५ दिवस खर्ची घालावे लागतात.
खोल समुद्रातील एका ट्रिपसाठी सव्वा ते दीड लाखापर्यंत खर्च येतो. समुद्राच्या तळाशी असलेली सर्वच प्रकारची मासळी या पद्धतीत पकडली जाते. या चांगल्या प्रतीची निर्यात करण्याजोगी असलेली मासळी खोल समुद्रातील मासेमारीत मिळत असल्याने या पद्धतीत मच्छीमारांची संख्या सर्वाधिक आहे.
खोल समुद्रातील मासेमारी करणारे मच्छीमार मासेमारीसाठी १ आॅगस्टपासूनच सुरुवात करणार असल्याने करंजा - मोरा - कसारा, ससून डॉक बंदरात हजारो मच्छीमारांची आणि मच्छीमार ट्रॉलर्सची मासेमारीच्या पूर्वतयारीसाठी गर्दी केली आहे. मच्छीमार बोटींच्या डागडुजी, रंगरंगोटी आणि इतर तत्सम कामांसाठी विविध बंदरात मच्छीमारांची लगबग सुरू आहे. १ आॅगस्टपासून मच्छीमार बोटींना डिझेल उपलब्ध होण्यास सुरुवात होणार आहे.
यावर्षी गणपती सण आॅगस्ट महिन्यातच आला आहे. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी एक तरी ट्रीप मारली तर सणासाठी खलाशी, मालकांच्या कनवटीला किमान खर्चासाठी पैसे उपलब्ध होतील.
१ आॅगस्टलाच खोल समुद्रात मासेमारीसाठी निघण्याची तयारी मालक, खलाशी वर्गाकडून सुरू आहे. डिझेल आणि आवश्यक साधनसामग्री उपलब्ध होताच तत्काळ हजारो मच्छीमार बोटी १ आॅगस्टपासून खोल समुद्राकडे मासेमारीसाठी रवाना होणार असल्याची माहिती करंजा मच्छीमार संस्थेचे अध्यक्ष शिवदास नाखवा यांनी दिली.