लहुळसेतील चार घरांचे साडेपाच लाखांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 11:23 PM2021-01-10T23:23:46+5:302021-01-10T23:24:12+5:30
खांबावर वीज पडल्याने फटका
लोकमत न्यूज नेटवर्क
पोलादपूर : तालुक्यातील लहुळसे गावात गुरुवारी रात्री वादळी पावसात विजेचा लोळ घराच्या शेजारी असलेल्या विद्युत पोलवर पडल्याने चार घरांना आगीने घेरले. या आगीत चार घराचे सुमारे ५ लाख ६६ हजार १०० रुपयांचे अंदाजे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे.
गुरुवारी सायंकाळी झालेल्या वादळी पावसात लहुळसे गावातील शिवराम रिंगे याच्या घराच्या शेजारी असलेल्या मराविमच्या विद्युत पोल वर विजेचा लोळ पडल्याने आगीचा भडक उडाला. यामध्ये शिवराम रिंगे सह दिनकर रिंगे, पंकज रिंगे, पांडुरंग रिंगे याच्या घराचे नुकसान झाले आहे.
शिवराम रिंगे याच्या घराचे १ लाख ५४ हजार ३०० रुपयांचे नुकसान झाले, यामध्ये घराची कौले, लाकडी खांब, लाकडी कपाट, कपडे, भांडी आदी जळून खाक झाले आहेत, तर दिनकर रिंगे यांच्या घराचे १ लाख ७४ हजार ६५० रुपयांचे साहित्य जळून खाक झाले. पंकज शंकर रिंगे यांच्या घराचे ७० हजार ८०० रुपयांचे नुकसान झाले आहे. पांडुरंग रिंगे यांच्या घराचे १ लाख ६६ हजार ३५० रुपयांचे नुकसान झाले. या नैसर्गिक आपत्तीमुळे रिंगे याचे अतोनात नुकसान झाले आहे. या घराचा तहसील कार्यालयातील तलाठी वैराळे यांनी घटनास्थळी जात पंचनामा केला आहे. महाड औद्योगिक वसाहतीचा अग्निशमन बंब रात्री निर्धारित वेळेत पोहोचल्यानंतर आगीवर रात्री ११.१५च्या सुमारास नियंत्रण मिळविले. मात्र, तोपर्यंत लाकडी साहित्य जळून खाक झाले होते.
ग्रामस्थांची मदत
ग्रामस्थांनी शर्तीचे प्रयत्न करत नदीतील पाणी आणत आगीवर मारत नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, चारही घरामध्ये लाकडी वासे, रीफा, लाकडासहित असल्याने आगीचा भडका मोठ्या प्रमाणावर उडाला होता.