पाच ग्रामपंचायतींचे दप्तर कचऱ्यात
By admin | Published: February 15, 2017 04:48 AM2017-02-15T04:48:41+5:302017-02-15T04:48:41+5:30
तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींची महत्त्वाची कागदपत्रे, ग्रामपंचायतीची कोरी लेटरपॅड्स, महत्त्वाचे ठराव आदिंसह कागदपत्रांचे
महाड : तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींची महत्त्वाची कागदपत्रे, ग्रामपंचायतीची कोरी लेटरपॅड्स, महत्त्वाचे ठराव आदिंसह कागदपत्रांचे दप्तर शहरानजीकच्या शिरगाव येथील रस्त्यालगत कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. ज्या ठिकाणी कचऱ्यात ही कागदपत्रे आढळून आली त्या ठिकाणाजवळच ग्रामसेवक वसाहत असून त्या वसाहतीत राहणाऱ्या एका ग्रामसेवकानेच ही महत्त्वाची कागदपत्रे रद्दी म्हणून कचऱ्यात टाकण्याचा प्रताप केल्याची चर्चा परिसरात होत आहे.
सोमवारी सायंकाळी ५ वाजता शिरगाव येथे एका तंबाखूच्या गोदामाला आग लागली होती. त्यावेळी घटनास्थळी गेलेल्या नागरिकांनी ग्रामपंचायतीचे दप्तर रस्त्याच्याच कडेला आढळून आले. या ढिगाऱ्यात नागाव, सव, राजिवली, राजेवाडी आदि ग्रामपंचायतींची कोरी लेटरहेड्स, सही शिक्का असलेली कोरी ओळखपत्रे, अॅसेसमेंट उतारे, शासनाच्या नवीन विविध योजनांची माहिती पुस्तके व पुस्तके, ग्रामपंचायतीच्या अनेक महत्त्वाच्या ठरावांच्या मूळ प्रती, नोंदणी पुस्तके, मोजणी पुस्तके आदि दस्तऐवज या कचऱ्यात दिसून आले. ग्रामसेवक वसाहतीत राहणाऱ्या ग्रामसेवकानेच ही कागदपत्रे रद्दी म्हणून कचऱ्यात टाकली असावीत, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत असून या कचऱ्यातील काही दस्तऐवजांचा गैरवापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
ग्रामपंचायतीची कागदपत्रे रेकॉर्ड म्हणून जतन करण्याऐवजी अशा प्रकारचे कचऱ्यात टाकण्याचे प्रताप करणाऱ्या बेजबाबदार ग्रामसेवकांवर पंचायत समितीने कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.