गांजा तस्करी प्रकरणी आणखी पाच अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 01:45 AM2018-06-30T01:45:06+5:302018-06-30T01:45:08+5:30
गांजा तस्करी प्रकरणात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने आणखीन पाच जणांना अटक केली आहे. २६ जून रोजी पोलिसांनी या प्रकरणात सर्वप्रथम दोन जणांना अटक केली
अलिबाग : गांजा तस्करी प्रकरणात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने आणखीन पाच जणांना अटक केली आहे. २६ जून रोजी पोलिसांनी या प्रकरणात सर्वप्रथम दोन जणांना अटक केली होती. त्यामुळे आता आरोपींची संख्या सात झाली आहे. पकडण्यात आलेल्या एका आरोपीकडून ५०० ग्रॅम गांजा सापडल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक शेख यांनी दिली.
२६ जूनला अलिबागमधील मुख्य गांजा विक्रेता आशिष तळेकर (४७) याच्यासोबत रोहित घरत (३३) या दोघांना अटक केली होती. या दोघांची पोलिसांनी चौकशी केली असता जिल्ह्यातील मुख्य गांजा विक्रेता हा उरण येथील असल्याची माहिती आशिष तळेकर यांनी दिली. तर अलिबागमध्ये कॉलेज तरुण-तरुणींना गांजा विक्री करणाऱ्या अजून चार जणांची माहिती रोहित घरत याने पोलिसांना दिली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने गांजाचा मुख्य तस्कर कमलाकर काशिनाथ गायकवाड ( ६१, रा. दादर पाडा, पो. दिघोडे, उरण), प्रणयजीत विष्णू पाटील ( ३२, रा. गोंधळपाडा), प्रताप पेरेकर ( २८), मितेश शुक्ला (२३), गजानन सोम्या नाईक ( ४७) अलिबाग या पाच जणांना ताब्यात घेतले आहे. यातील प्रणयजीत पाटील याला ताब्यात घेऊन घराची झडती घेतली असता त्याच्याकडून ५०० ग्रॅम गांजा हस्तगत केला आहे, तर अन्य जणांकडे काहीही मिळाले नाही. या पाचही जणांना अटक करण्यात येऊन त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले.
जिल्ह्यातील मुख्य गांजा विक्रेता कमलाकर गायकवाड हा गुन्हेगारी वृत्तीचा असून त्याच्यावर ३ प्रकरणी खटला सुरू आहेत. कमलाकर हा नक्षलग्रस्त भागातून गांजा घेऊन येत होता, तर त्याचा मुलगा हा कर्नाटकमध्ये राहातो. तोसुद्धा गांजा विक्रेता म्हणून काम करीत आहे, अशी माहिती शेख यांनी दिली. या सर्व गांजा तस्करांच्या मुसक्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने आवळल्यामुळे जिल्ह्यातील इतर गांजा विक्रेत्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.