- मयूर तांबडे
पनवेल : तालुक्यातील कर्नाळा किल्ला व प्रबळगडावरून खाली पडून सहा वर्षांत पाच जणांचा मृत्यू झाल्याची नोंद तालुका पोलीस ठाण्यात आहे. तरुण मुले, मुली कोणतीही साधन सामुग्री न घेता सध्या ट्रेकिंगला जाताना दिसत आहेत. मात्र, ही ट्रेकिंग त्यांच्या जीवावर बेतत आहे. तरुणाई ट्रेकिंगला जाताना मृत्यू ओढवून घेत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे या ठिकाणी ट्रेकिंगसाठी जाताना सावधानतेचा इशारा देण्यात येत आहे.ट्रेक करण्यासाठी अनेक गिर्यारोहक व पर्यटक नेहमीच माची प्रबळगडावर येत असतात. यापैकी काहीना मृत्यूने गाठले आहे, तर यात काही जण जखमी होत असल्याचे सांगितले जात आहे. माची प्रबळगड सर करण्याचा प्रयत्न करत असताना पाय घसरून पडल्याची घटना चार दिवसांपूर्वी नुकतीच घडली आहे. पुणे येथील पिंपळे सौदागर येथील चेतन सुनील धांडे हा २६ वर्षीय युवक व मालविका कुलकर्णी ही त्याची २५ वर्षीय सहकारी शनिवार, १० फेब्रुवारीलाप्रबळगडावर ट्रॅकिंग करता आले होते. गड चढायला सुरुवात केल्यानंतर प्रबळगडाचा शेवटचा टप्पा असलेला कलावती दुर्ग चढत असताना चेतन याने पकडलेला दगड निसटल्याने तो खाली पडला. त्यात त्याचा खाली पडून मृत्यू झाला. पोलिसांनी निसर्ग मित्र संघटना व स्थानिकांच्या मदतीने हा मृतदेह बाहेर काढला. अनेकांना किल्ला/गड ट्रेक करण्याचा अनुभव नसतानादेखील तो सर करण्याचा प्रयत्न केला जातो, त्यामुळे अनर्थ घडत आहे. ट्रेकिंगची वाट मृत्यूकडे नेत असल्याने पोलीस प्रशासनाकडून सावधतेचा इशारा देण्यात येत आहे. गेल्या सहा वर्षांत पाच मृत्यू झाल्याने ट्रेकिंग करणाºयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. यामुळे पर्यटकांनी व गिर्यारोहकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. सध्या वीकेंडला सहकुटुंब ट्रेकसाठी जाणाºयांची संख्या वाढत आहे. तरुणांसह खास ज्येष्ठ नागरिकदेखील ट्रेकची आखणी करताना दिसत आहेत. ट्रेकमध्ये कोणताही अपघात घडल्यास अथवा त्रास जाणवल्यास प्रथमोपचारांची माहिती असणे गरजेचे आहे. ट्रेकरूटमध्ये अपघात झाल्यास आणि प्रथमोपचारांची माहिती नसल्यास मदत मिळणे अवघड असते. निसर्गाचा स्वभाव समजून घेतला तर ट्रेकिंग, भटकंती वा पदभ्रमण या सगळ्या गोष्टी आनंददायीच ठरतात. निसर्गातले थ्रील आजमावण्यात चूक काहीच नाही; पण जेव्हा हे थ्रील जीवावर बेतते तेव्हा फारच उशीर झालेला असतो. ट्रेकिंगला बाहेर पडताना एकटे असू वा सोबत ग्रुप असो. आपल्या सुरक्षेची सर्वात पहिली जबाबदारी आपलीच असते. त्यामुळे ट्रेकिंगला जाताना त्या ठिकाणची संपूर्ण माहिती असणे गरजेचे असते. ट्रेकिंगला जाताना सर्व साधन सामुग्री जवळ बाळगणे अपेक्षित आहे.जानेवारी २०१२मध्ये पुणे येथील भावेन पटेल (२६), या युवकाचा कर्नाळा किल्ला चढत असताना पाय घसरून खाली पडून मृत्यू झाला. एप्रिल २०१३मध्ये बोरीवली येथील करन मेहता (२५) हा तरु ण आपल्या मित्रांसह कर्नाळा किल्ला सर करत असताना अचानकपणे मधमाशांनी केलेल्या हल्लात सर्व जण घाबरून सैरावैरा पळत असताना करन मेहता या तरु णाचा किल्यावरून पाय घसरून खाली पडून मृत्यू झाला. डिसेंबर २०१३मध्ये जालना येथील अर्जुन जोगदंड (२१) या युवकाचा हाजीमलंग येथील डोंगरावरून खाली पडून मृत्यू झाला. डिसेंबर २०१६मध्ये हैदराबाद येथील रुचिता गुप्ता कनौडिया (२७) या तरु णीचा माची प्रबळगड येथून पाय घसरून खाली पडून मृत्यू झाला. तर फेब्रुवारी २०१८मध्ये पुणे येथील चेतन धांडे (२५) या तरु णाचा माची प्रबळगड येथे पाय घसरून खाली पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. निसर्ग मित्र संघटना व स्थानिक गावकºयांच्या मदतीने पोलिसांनी या घटनेतील मृत नागरिकांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश मिळवले. त्यामुळे ट्रेकिंगला जाताना सावधानता बाळगण्याचा इशारा दिला जात आहे.