कर्जत : आकडे टाकणे, चोरून वीज वापरणे, याचे प्रमाण जास्त असल्याने महावितरण कंपनी नेहमीच तोट्यात असते, महावितरण कंपनीने वीजचोरीप्रकरणी कर्जतमध्ये धडक मोहीम राबविली असून, तालुक्यातील पाच जणांवर कर्जत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
महावितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता आनंद घुले यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचाऱ्यांनी वीजचोरीप्रकरणी धडक कारवाई केली. महावितरण कंपनीचे विद्युत मीटर नसताना कंपनीच्या एल.टी. लाइनवर आकडा टाकून घरातील बोर्डात डायरेक्ट कनेक्शन घेतली असल्याचे आढळून आले. या वेळी तालुक्यातील तिवरे, तांबस, उम्रोलीमधील प्रत्येकी एक आणि सापेलेमधील दोन अशा पाच जणांनी सहा हजार २९३ युनिटची, ७४ हजार ७७० रुपयांची वीजचोरी केली आहे. या पाच जणांविरोधात कर्जत पोलीस ठाण्यात कनिष्ठ अभियंता वैभव डफळ यांनी फिर्याद दाखल केली आहे. या प्रकरणी पोलीस निरीक्षक अरुण भोर यांच्या मार्गदर्शनाखाली पाच पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तपास करीत आहेत.
सापेले येथे राहणारे दीपक पवार यांच्या निवासस्थानी कंपनीचा विद्युत मीटर नसताना एल.टी. लाइनवर आकडा टाकून वायरचे दुसरे टोक घरातील लाइटच्या बोर्डला डायरेक्ट कनेक्शन जोडून एकूण १३ हजार ३३० रुपये किमतीची १२८४ युनिटची वीज चोरी करून कायमस्वरूपी थकबाकी एकूण १८ हजार १०० रुपये किमतीची, असे एकूण वीजबिल ३१ हजार ४३० रुपये महावितरण कंपनीस भरले नाहीत, तर तालुक्यातील उम्रोली येथे राहणारे किशोर भानुदास लोंगले यांनी डायरेक्ट कनेक्शन जोडून १६ हजार २० रुपये किमतीची ८७७ युनिटची वीजचोरी केली आहे. या सर्वांविरोधातकर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तिवरे येथे १४०४ युनिटची वीजचोरीकर्जत तालुक्यातील तिवरे येथे चंद्रकांत ठाकरे यांच्या निवासस्थानी महावितरण कंपनीचा विद्युत मीटर नसताना एल.टी. लाइनवर आकडा टाकून घरातील लाइटच्या बोर्डला डायरेक्ट कनेक्शन जोडून एकूण १५ हजार १४० रुपये किमतीची १४०४ युनिटची वीज चोरली. तर सापेले येथील जगदीश अण्णा पवार यांनीही डायरेक्ट कनेक्शन जोडून एकूण १५ हजार १४० रुपये किमतीची १४०४ युनिटची वीज चोरी केली. तांबस येथे राहणारे राजेंद्र रघुनाथ शेळके यांनी डायरेक्ट कनेक्शन जोडून वीजचोरी करण्यात आली आहे.