सुधागडमध्ये पाच शाळा बंद
By admin | Published: July 16, 2016 01:58 AM2016-07-16T01:58:55+5:302016-07-16T01:58:55+5:30
‘गाव तेथे शाळा’ या धोरणानुसार सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळा चालू झाल्या. परंतु गेल्या काही वर्षात ग्रामीण भागातही इंग्रजीचे वारे वाहू लागल्याने
पाली : ‘गाव तेथे शाळा’ या धोरणानुसार सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळा चालू झाल्या. परंतु गेल्या काही वर्षात ग्रामीण भागातही इंग्रजीचे वारे वाहू लागल्याने जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थ्यांची संख्या रोडावू लागली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर सुधागड तालुक्यातील तोरणकेवाडी, पुई, बलाप, गोंडाळे आणि कोंडजाई येथील जि. प. च्या मराठी शाळा शासनाने बंद केल्या आहेत.
गावातील काही कुटुंबांनी रोजगाराच्या शोधात शहराकडे स्थलांतर केले असले तरी जी कुटुंबे गावात आहेत, त्यांच्या मुलांनी आता शिकायचे कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या मुलांना शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सुधागड तालुक्यात आता गावच्या ठिकाणी देखील इंग्रजी माध्यमातील शाळा झाल्यामुळे जि. प. च्या शाळांमध्ये विद्यार्थी कमी झाले आहेत. मराठी शाळांमधील शिक्षणाचा दर्जा सुधारायला हवा याबाबतीत सर्व स्तरातून नेहमीच आवाज उठत असतो. परंतु दर्जा सुधारताना मात्र दिसत नाही. याला शिक्षकांमधील अंतर्गत राजकारण व हेवेदावे कारणीभूत असल्याचे काही पालकांचे म्हणणे आहे. जि. प. च्या शाळांमध्ये सेमी इंग्लिश अभ्यासक्रमाची प्रभावी अंमलबजावणी होताना दिसत नाही. जि. प. च्या बहुतांशी शाळा गळक्या, पडक्या तसेच वीजपुरवठा नसलेल्या अवस्थेत आहेत.
शासनाच्या मानव विकास विभागातर्फे सुधागड तालुक्यात आजही कित्येक वाड्यांमध्ये एसटी पोहचत नाहीत. काही ठिकाणी सुरू असलेल्या फेऱ्याही महामंडळाने बंद केल्या आहेत. तसेच शाळांमध्ये जावून बस पासच्या सुविधेबाबतही अंमलबजावणी होताना दिसत नाही.