पनवेलमधील जिल्हा परिषदेच्या पाच शाळा होणार बंद, शिक्षण विभागाची माहिती, इतर शाळांमध्ये समायोजित करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 03:38 AM2017-12-12T03:38:36+5:302017-12-12T03:38:49+5:30
कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्याचा परिणाम ग्रामीण भागातील प्राथमिक शिक्षणावर होणार आहे. पनवेल तालुक्यातील दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या पाच शाळा बंद होणार असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून मिळाली आहे.
- मयूर तांबडे
पनवेल : कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्याचा परिणाम ग्रामीण भागातील प्राथमिक शिक्षणावर होणार आहे. पनवेल तालुक्यातील दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या पाच शाळा बंद होणार असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून मिळाली आहे. गारमाळ, टोकाची वाडी, मोहपे, सतीची वाडी या चार शाळा तर मालडुंगे व बापदेववाडी या शाळेतील कोणतीही एक अशा पाच शाळा इतर शाळांमध्ये समायोजित करण्यात येणार आहेत.
पनवेल तालुक्यात खासगी व इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे प्रमाण वाढल्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थी संख्या घटत आहे. पनवेल तालुक्यात शिक्षण अधिकाºयांनी शाळांची पाहणी करून त्यांच्या डागडुजीकरणाकडे लक्ष दिले तर विद्यार्थी संख्या वाढण्यास मदत होऊ शकते. पावसाळ्यात जिल्हा परिषदेच्या काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांना बसणे देखील धोक्याचे ठरत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तसेच शाळेतील शौचालयाची देखील दुरवस्था झालेली असल्याचे दिसत आहे, तर काही शाळेतील शौचालयांचे दरवाजे तुटलेले दिसत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे अतोनात हाल होत आहेत.
तालुक्यात सद्यस्थितीत जिल्हा परिषदेच्या २५७ शाळा आहेत. यापूर्वी तालुक्यातील शाळांची संख्या २६४ होती. मात्र कमी विद्यार्थी संख्येअभावी ७ शाळा बंद करण्यात आल्या आहेत. कोंड्याची वाडी (वाजे), चाफेवाडी (आपटे), चिंचवाडी (वाजे), खंगारपाडा (सुकापूर), वाघ्राची वाडी (कळंबोली), माची प्रबळ (नेरे), वांगणी तर्फे तळोजे (चिंध्रण) या शाळा यापूर्वीच बंद झालेल्या आहेत. तर शासनाच्या नवीन निर्णयानुसार जिल्हा परिषदेच्या ५ शाळा समायोजित करण्यात येणार आहेत. या शाळेतील विद्यार्थ्यांना खैरवाडी, बागेची वाडी, पोयंजे, धामनी, मालडुंगे, सतीची वाडी या शाळांमध्ये समायोजित करण्यात येणार आहे. कमी पटसंख्येतील विद्यार्थी अन्य शाळेत स्थलांतर केल्यानंतर बंद झालेल्या शाळेतील शिक्षकाची पदस्थापना ही विद्यार्थी समायोजन झालेल्या शाळांमध्ये तात्पुरत्या स्वरूपात होणार आहे. त्या शाळांमध्येच त्या शिक्षकाचे वेतन काढले जाणार आहे. तालुक्यातील काही शाळा या दुर्गम भागात आहेत. या शाळेतील विद्यार्थ्यांना दोन ते तीन कि.मी. पर्यंत दुसरी शाळा उपलब्ध आहे. तेथे त्यांचे समायोजन केले जाणार आहे. त्यामुळे शिक्षणासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आता तीन-चार कि.मी. पायपीट करावी लागणार असल्याचे समोर आले आहे.
कमी गुणवत्तेमुळे पटसंख्या खालावत असलेल्या शाळा बंद करण्यात येणार असल्याचे शासनाने निर्देश दिले आहेत. ० ते १० पटसंख्या असलेल्या शाळा बंद करून नजीकच्या शाळेत चांगली गुणवत्ता मिळावी यादृष्टीने समायोजन होणार आहे.
गारमाळ येथे ९ विद्यार्थी, टोकाची वाडी येथे ८ विद्यार्थी, मोहपे येथे ६ , बापदेव वाडी येथे ७ , सतीची वाडी येथे ३ व मालडुंगे येथे ६ विद्यार्थी संख्या आहे. यापैकी मालडुंगे व सतीची वाडी या दोन शाळांपैकी कोणतीही एक शाळा अन्य शाळेत व इतर ४ अशा पाच शाळा समायोजित होणार आहेत.