कर्जत : तालुक्यातील नेरळनजीकच्या धामोते येथील जमीन मिळकत हरवलेल्या व्यक्तीच्या जागी बनावट व्यक्ती दाखवून बनावट कुलमुखत्यार पत्र तयार करून हडप करण्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला. याप्रकरणी हरवलेल्या व्यक्तीच्या नावाने संगनमताने जमीन हडप केलेल्या पाच जणांच्या विरु द्ध नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला असून पोलिसांनी त्यांना १७ फेब्रुवारी रोजी अटक केली. सोमवार १८ फेब्रुवारी रोजी त्यांना कर्जत न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने २२ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
३ जानेवारी रोजी नेरळ पोलीस ठाण्यात बनावट कुलअखत्यारपत्राच्या आधारे जमीन हडप करणाºया फसवणूक करणाºया नितीन भानुदास बोराडे (३२), पराग तथा सनी तानाजी चव्हाण (३३), भानुदास जगन्नाथ बोराडे (३८), नितीन चिंतामण आबाळे आणि दीपक दत्तात्रेय शिंदे यांच्याविरु द्ध गुन्हा दाखल केला होता. त्यांचा अटकपूर्व जामीन जिल्हा न्यायालयाने ६ फेब्रुवारी रोजी नामंजूर केला होता. मात्र त्यानंतर नेरळ पोलिसांनी त्यांना अटक करायला पाहिजे होती, मात्र पोलिसांना ते सापडले नाहीत.
सोमवार ११ फेब्रुवारी रोजी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी अर्ज केला होता. मात्र तोही अर्ज फेटाळण्यात आला. अखेर १७ फेब्रुवारी रोजी पाच जणांना नेरळ पोलिसांनी ताब्यात घेतले. १८ फेब्रुवारी रोजी त्यांना कर्जत येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने २२ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोडठी सुनावली आहे. सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आर. एस. शेगडे पुढील तपास करत आहेत.