रायगडमध्ये कोविड रुग्णांसाठी पाच हजार बेड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2020 12:33 AM2020-07-31T00:33:28+5:302020-07-31T00:33:40+5:30
आॅक्सिजन, व्हेंटिलेटर्सची सुविधा : जिल्ह्यात ४५ ठिकाणी यंत्रणा सज्ज
निखिल म्हात्रे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अलिबाग : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. सध्या शहर प्रादुर्भावाने ग्रस्त झाले आहे. जिल्हा प्रशासनाने कोरोनाचा वाढता आलेख लक्षात घेऊन जिल्ह्यात ४५ ठिकाणी उपचार यंत्रणा सज्ज ठेवली आहे. या कोविड सेंटरमधून ५ हजार १४४ बेड तयार करण्यात आले आहेत. यामध्ये आॅक्सिजन सपोर्टेड बेड, आयसीयू बेड आणि व्हेंटिलेटर्स सुविधा कार्यान्वित करण्यात आली आहे.
रायगड जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अधिक आहे. असे असले तरी कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याचे विदारक चित्रदेखील तितकेच भयावह आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे गेल्या पाच महिन्यांत रायगड जिल्ह्यात १५ हजारांहून अधिक व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली आहे. यामधून १० हजार ६०९ व्यक्तींनी कोरोनावर मात केली आहे. रायगड जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी जिल्हा प्रशासनाने केंद्र आणि राज्य सरकारने जाहीर केलेल्या टाळेबंदीचे तंतोतंत पालन केले. यामुळे लॉकडाऊन कालावधीत पनवेल आणि उरण तालुका वगळता जिल्ह्यातील उर्वरित तालुक्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढला नव्हता. केंद्राबरोबरच राज्याने पहिला अनलॉक जाहीर केला आणि कोरोनाच्या हॉटस्पॉटमधून नागरिकांनी आपले गाव गाठले; आणि येथेच कोरोनाने शहरातून ग्रामीण भागात शिरकाव केला. पनवेल, उरणपाठोपाठ अलिबाग, रोहा, पेण, कर्जत, महाड आदी तालुक्यांमध्ये संसर्गाची बाधा होऊन कोरोनाबाधित व्यक्ती सापडू लागल्या आहेत. गेल्या महिनाभरापासून सुरू झालेली कोरोनाबाधित व्यक्ती आढळण्याची मालिका आजही कायम आहे.
मार्च महिन्यापासून आतापर्यंत कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या १५ हजारांची संख्या पार करण्याच्या तयारीत आहे. ४५ हजार नागरिकांची कोविड चाचणी करण्यात आली आहे. कोरोनामुळे जिल्ह्यात ३६८ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आजपर्यंत ३ हजार ४७७ रुग्ण आहेत. या व्यक्तींना अधिक उपचारासाठी तसेच त्यांच्या निगराणीसाठी जिल्ह्यात ४५ कोविड सेंटर उभारले आहेत. यामध्ये कोविड केअर सेंटर १८, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर २५, डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल २ यांचा समावेश आहे. या रुग्णालयांमध्ये ५ हजार १४४ बेड्सची निर्मिती करण्यात आली आहे. या बेड्समध्ये आॅक्सिजन सपोर्टेड ७५८ आणि आय.सी.यू. बेड १९३ आहेत. या सर्व कोविड सेंटरमध्ये ६४ व्हेंटिलेटर्स सज्ज ठेवण्यात आले आहेत. बाधित किंवा संशयित असणाऱ्या रुग्णांना उपचारासाठी मुंबईत नेण्यासाठी १०३ रुग्णवाहिका सज्ज ठेवल्या आहेत.
लॉकडाऊनचाही उपयोग नाही
च्कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढण्यास सुरुवात झाल्यानंतर लोकप्रतिनिधींच्या आग्रहास्तव जिल्हा प्रशासनाने १० दिवसांचा कडक लॉकडाऊन सुरू केला.
च्या लॉकडाऊनमुळे कोरोनाचा संसर्ग कमी होईल असे वाटले होते; परंतु अनेकांची घोर निराशा झाली.
च्लॉकडाऊनमध्ये कोरोना संसर्ग वाढत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी दोन दिवस आधीच निर्बंध उठविले. कोरोनाग्रस्त १५ हजारांचा आकडा पार करण्याच्या तयारीत आहेत.