- सिकंदर अनवारे, दासगावमहाड तालुक्यातील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर रायगडजवळच असणाऱ्या कोतुर्डे धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या करंजखोल, गंधारपाले, केंबुर्ली, वहूर आणि दासगांव या ५ गावांना सध्या पाणीटंचाईची मोठी झळ बसली होती. गेल्या पाच वर्षांपासून कोतुर्डे धरणाची पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात कमी होत असून, गेल्या वर्षी याच धरणाला मोठे भगदाड पडले होते. त्या ठिकाणाहून या पाच गावांसाठी सोडण्यात येणारे पाणी या पाच गावांची जॅकवेल जवळपास या धरणापासून २० किमी एवढ्या अंतरावर असल्याने हे धरणाचे सोडलेले पाणी गेल्या १५ दिवसांपासून नळ पाणीपुरवठा योजना ठप्प झाली आहे. सध्याच्या या पाच गावांना तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून, या पाचही गावांमधून अद्याप एकाही ग्रामपंचायतीने गावासाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी केली नसल्याची माहिती गटविकास अधिकारी महाड संघटना खिलारे यांनी दिली आहे. मात्र पाणीपुरवठ्यासाठी टँकरद्वारे मागणी करूनही पाणी न आल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.महाड तालुक्यातील या पाच गावांच्या नळ पाणीपुरवठा योजनांना रायगडच्या जवळच असलेल्या कोतुर्डे धरणातूनच होत आहे. गेल्या वर्षी धरणाला भगदाड पडून गळती लागली होती. मात्र त्या वेळी त्या धरणाची तात्पुरती डागडुजी करण्यात आली होती. अनेक वर्षांपासून एप्रिल महिन्यातच या धरणापासून या पाच गावांना मिळणारे पाणी बंद होते. पंचायत समिती महाड यांच्यामार्फत या पाचही गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो. पाच गावांतील जवळपास २५ वाड्यांना भीषण पाणीटंचाईची झळ बसली आहे. करंजखोल, गंधारपाले, केंबुर्ली आणि वहूर या गावांना विहिरींची संख्या कमी असून, त्याही विहिरींचे पाणी संपत आले आहे. दासगांवमध्ये काही विहिरी कोरड्या झाल्या आहेत, तर काही विहिरींचे पाणी औद्योगिक वसाहतींच्या सांडपाण्यामुळे दूषित झाले आहे. परिणामी पाचही गावांची सध्याची पाण्याची परिस्थिती गेल्या १५ दिवसांपासून बिकट आहे व येत्या पावसाळ्यापर्यंत परिस्थिती बिकट राहणार असल्याचे चिन्ह दिसत आहे.
महाडमधील पाच गावांना भीषण पाणीटंचाई
By admin | Published: April 17, 2016 1:16 AM