पेणमध्ये पाच वर्षांतला ‘रेकॉर्ड ब्रेक’ पाऊस; ३,६८४ मिमी पर्जन्यमान, धरणे ओव्हर फ्लो

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2024 07:33 AM2024-09-27T07:33:31+5:302024-09-27T07:33:39+5:30

यंदा तालुक्यातील एकूण ३ हजार ६८४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली

Five year record breaking rainfall in Pen dam overflow | पेणमध्ये पाच वर्षांतला ‘रेकॉर्ड ब्रेक’ पाऊस; ३,६८४ मिमी पर्जन्यमान, धरणे ओव्हर फ्लो

पेणमध्ये पाच वर्षांतला ‘रेकॉर्ड ब्रेक’ पाऊस; ३,६८४ मिमी पर्जन्यमान, धरणे ओव्हर फ्लो

दत्ता म्हात्रे

पेण : तालुक्यात बुधवारी परतीचा मुसळधार पाऊस कोसळला. यामुळे हेटवणे धरणात शंभर टक्के पाणीसाठा झाला असून नवी मुंबई, पनवेल आणि पेणची  पाण्याची समस्या  मिटली आहे. यंदा तालुक्यातील एकूण ३ हजार ६८४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. हवामान विभागाने रायगड जिल्ह्यात बुधवारी रेड अलर्ट घोषित केला होता. त्यानुसारच दिवसभर आणि रात्री मेघगर्जनेसह धुवांधार पाऊस पडला.  तालुक्यात सरासरी १०० मि.मी. पावसाची नोंद झाली. यंदा एकूण पावसाची नोंद ३,६८४ मिलिमीटर झाली आहे. गेल्या पाच वर्षांतील रेकॉर्ड ब्रेक पाऊस पडला असून नवरात्रोत्सवात १२ ऑक्टोबरपर्यंत जोर कायम राहिला तर चार हजार मिमीपेक्षा जास्त प्रमाणात पावसाची नोंद होईल, असा अंदाज शेतकरी व्यक्त करत आहेत. गुरुवारीही अनेक भागात पावसाची संततधार सुरू होती.

नवी मुंबईकरांची तहान भागणार

नवी मुंबई, पेण, उरण आणि  पनवेल परिसराला पाणीपुरवठा करणारे पेण तालुक्यातील हेटवणे मध्यम प्रकल्प धरणही १०० टक्के भरले आहे. धरणाची साठवण क्षमता ५.१२ टीएमसीपेक्षा जास्त पाणीसाठा जमा झाला आहे धरणात ९९ टक्क्यांहून अधिक पाणीसाठा जमा आहे. नदी पात्रात धरण सांडव्यातून सोडलेले पाणी आणि पावसामुळे नदीपात्रात पाण्याची पातळी वाढली आहे. 

२८ धरणे तुडुंब 

रायगडमधील धरणक्षेत्रात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडल्यामुळे जिल्ह्यातील लघुपाटबंधारे विभागाच्या अखत्यारितील २८ धरणांपैकी २८ धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत. 

सध्या धरणांमध्ये धारण क्षमतेच्या १०० टक्के साठा आहे. पावसाचे सातत्य कायम असल्याने पेणमध्ये मार्च ते मे अखेरपर्यंत जाणवणारी पाणीटंचाई दूर होईल, अशी आशा आहे. हेटवणे, आंबेघर, शहापाडा धरणे जुलै महिन्यातच ‘ओव्हर फ्लो’ झाली आहेत. 

आता हस्त नक्षत्रास प्रारंभ झाला असून पावसाची संततधार सुरू आहे. अशीच संततधार सुरू राहिली तर काढणीला आलेल्या भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे.

Web Title: Five year record breaking rainfall in Pen dam overflow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.