कर्जत-नेरळमध्ये मध्यरात्री ध्वजारोहण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2015 10:55 PM2015-08-15T22:55:44+5:302015-08-15T22:55:44+5:30
कर्जत तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मध्यरात्रीच्या ध्वजारोहण समारंभास कर्जतकरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून उदंड प्रतिसाद दिला.
कर्जत : कर्जत तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मध्यरात्रीच्या ध्वजारोहण समारंभास कर्जतकरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून उदंड प्रतिसाद दिला. विशेष म्हणजे यंदा उपस्थिती लक्षणीय होती. मध्यरात्रीच्या झेंडा वंदनाचे हे अकरावे वर्ष आहे.
कर्जतच्या भाऊसाहेब राऊत चौकात मध्यरात्री ध्वजारोहणाचे आयोजन करण्यात आले होते. चौकाच्या नामफलकाला जे. एम. मिर्झा यांनी पुष्पहार अर्पण केला. नगराध्यक्ष राजेश लाड यांच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आले आणि ठीक बारा वाजून दोन मिनिटांनी पत्रकार संघाच्या अध्यक्षा वैदेही पुरोहित यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी सुनील दांडेकर, श्रीराम पुरोहित, कार्यवाह संजय गायकवाड आदी उपस्थित होते.
सकाळी झालेल्या ध्वजारोहण कार्यक्र मात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये नगरसेवक संतोष पाटील, पंचायत समिती कार्यालयात सभापती सुवर्णा बांगारे, नगरपरिषदेमध्ये नगराध्यक्ष राजेश लाड, तहसील कार्यालयात तहसीलदार रवींद्र बाविस्कर, उपविभागीय कार्यालयात उपविभागीय अधिकारी राजेंद्र बोरकर, पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक रमेश भोसले, कोकण ज्ञानपीठ कर्जत महाविद्यालयात प्राचार्य डॉ. रवींद्र देशमुख, अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राचार्य डॉ. मधुकर लोंगरे, फार्मसी महाविद्यालयात प्राचार्य डॉ. मोहन काळे, इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये अध्यक्ष झुलकरनैन डाभिया यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
मशालफेरीनंतर मध्यरात्री ध्वजारोहण
नेरळ : नेरळ येथील हुतात्मा चौकामध्ये सलग अकराव्या वर्षी मध्यरात्री राष्ट्रीय झेंडा फडकविण्यात आला. शालेय विद्यार्थी आणि महाविद्यालयीन तरु ण यांनी मशाल फेरी काढून रात्रीच्या वेळी नेरळमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण केले. रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुरेश टोकरे यांच्या हस्ते मध्यरात्री तिरंगा फडकविण्यात आला. त्यावेळी पाचशेहून अधिक तरु ण हुतात्मा चौकात उपस्थित होते.
नेरळ येथील हुतात्मा स्मारक समितीच्या वतीने गेली दहा वर्षे हुतात्मा चौकामध्ये राष्ट्रीय झेंडा १४ आॅगस्टच्या मध्यरात्री फडकविण्याचा कार्यक्र म आयोजित केला जातो. नेरळ -माथेरान रस्त्यावर असलेल्या हुतात्मा चौकामध्ये स्वातंत्र्यदिन कार्यक्र म साजरा होतो. रात्री अकरा वाजता मशालफेरी काढण्यात आली.