अलिबाग : मंत्रिपद मिळवून रायगडचे पालकमंत्री होण्याचे स्वप्न सत्तेत गेलेले शिंदे गटाचे प्रतोद आमदार भरत गोगावले हे मनाशी बाळगून आहेत. मात्र आजपर्यंत गोगावले हे मंत्री पदापासून दूर राहिले आहेत. २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी अलिबाग येथे मुख्य ध्वजरोहण कार्यक्रम महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते पार पडणार आहे. त्यामुळे रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे होणार काय अशी चर्चा जिल्ह्यात रंगली आहे. आमदार भरत गोगावले यांना मंत्रिपदासाठी अजून किती प्रतीक्षा करावी लागेल असा प्रश्न निर्माण झाला आहे.
महाविकास आघाडी सरकार काळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्ह्यातील एकमेव असलेल्या आमदार अदिती तटकरे यांना मंत्रिपद देऊन जिल्ह्याचे पालकमंत्री पद देण्यात आले होते. यावरून शिवसेनेमध्ये खदखद होती. अखेर शिवसेनेचे जिल्ह्यातील आमदार पक्षातून बाहेर पडून शिंदे सोबत गेले. शिंदे आणि भाजप सत्तेत आले. त्यामुळे शिंदे गटाचे प्रतोद आमदार भरत गोगावले यांना मंत्रिपद मिळेल अशी चर्चा होती. रायगडचे पालकमंत्री पद उदय सामंत यांना दिले आहे. मात्र गोगावले हे आजही मंत्री पदापासून दूरच राहिले आहेत. राज्याच्या सत्तेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने प्रवेश केला. त्यानंतर अदिती तटकरे याना कॅबिनेट मंत्री बनवून महिला व बाल विकास विभागाच्या मंत्रिपदाची माळ पडली.
अदिती तटकरे पुन्हा मंत्री झाल्या पण आमदार भरत गोगावले आजही मंत्रिमंडळाच्या बाहेर राहिले आहेत. २६ जानेवारी रोजी प्रजाकसत्ता दिनी शासनाने पालकमंत्री आणि मंत्री यांची ध्वजरोहण करणारी यादी जाहीर केली आहे. रायगड मध्ये मुख्य ध्वजरोहण सोहळा अदिती तटकरे यांच्या शुभहस्ते पार पडणार आहे. त्यामुळे रायगडचे पालकमंत्री पद हे राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाणार काय अशी चर्चा रंगली आहे. आमदार भरत गोगावले यांचा मंत्री मंडळात प्रवेश कधी होणार याकडे शिंदे गटाचे लक्ष लागले आहे.