वैैभव गायकर, पनवेलनवीन पनवेल उड्डाणपुलाखाली शहरात प्रवेश करण्यापूर्वीच एचडीएफसी सर्कलमधील वाहतूककोंडी ही वाहनचालकांच्या स्वागतासाठी तयार असते. चार ठिकाणांहून येणारऱ्या गाड्या एकाच ठिकाणी या सर्कलजवळ येत असल्याने ही वाहतूककोंडी वाढत जाते. त्यातच या ठिकाणी असलेल्या सर्कलचा आकार देखील मोठा असल्याने जागेअभावी या ठिकाणी वाहतूककोंडी वाढत जाते. यासंदर्भात पनवेल वाहतूक शाखेच्या वतीने सिडकोला पत्र लिहून या ठिकणच्या सर्कलचा आकार कमी करण्याची विनंती सिडकोला करण्यात आली होती. त्या मागणीला सिडकोकडून प्रतिसाद मिळत असून, लवकरच या ठिकाणी होणाऱ्या वाहतूककोंडीतून वाहनचालकांची सुटका होणार आहे. या ठिकाणी बंदोबस्तासाठी असलेल्या वाहतूक पोलिसांची देखील ही वाहतूककोंडी सोडविताना नाकी नऊ येते. नवीन पनवेलमधील शाळा, महाविद्यालये, बँका, दवाखाने असल्याने या ठिकाणी विद्यार्थी, नागरिकांची मोठी वर्दळ असते. मात्र पाच मिनिटांचे अंतर गाठण्यासाठी २० ते २५ मिनिटे या ठिकाणी खर्च करावी लागतात. अपुरी जागा, त्यातच दिवसेंदिवस वाढत्या गाड्यांच्या संख्येमुळे या ठिकाणी वाहतूककोंडी ही समस्या गंभीर बनत चालली आहे. यासंदर्भात मागील वर्षभरापासून पनवेल वाहतूक पोलीस सिडकोशी पत्रव्यवहार करीत आहेत. नव्याने सर्कल उभारून कमी जागेत त्याची उभारणी करावी अशी मागणी या पत्राद्वारे सिडकोकडे करण्यात आली होती. नवीन पनवेलमध्ये सीकेटी, पिल्लई, विसपुते, बांठिया आदींसह अनेक लहानमोठ्या शाळा-महाविद्यालये आहेत. दुपारी १२ च्या सुमारास शाळा-महाविद्यालये सुटण्याच्या वेळेला ही वाहतूककोंडी प्रचंड वाढते. शाळेच्या बस या ठिकाणाहून जात असताना ही वाहतूककोंडी आणखीनच वाढते. परीक्षांच्या वेळेला देखील हीच समस्या उद्भवते. काही परीक्षार्थींना तर वेळेवर परीक्षांना पोचता येत नाही.
एचडीएफसी सर्कल घेणार मोकळा श्वास
By admin | Published: July 12, 2016 2:48 AM