- जयंत धुळप
अलिबाग: पर्यटकांना समुद्रात पोहताना सुरक्षित हद्दीची कल्पना यावी, यासाठी जिल्ह्यातील सर्व प्रमुख समुद्र किनाऱ्यांवर फ्लोटींग बोयाज बसवले जात आहेत. पहिल्या टप्प्यात मुरुड आणि काशिद या दोन बीचेसवर बोयाज बसवण्यात आले आहेत. यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या संकल्पनेतून जिल्हा नियोजन समितीच्या नावीन्यपूर्ण योजनेतून ५ लाख २० हजार रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. पर्यटक सुरक्षा व्यवस्था अंतर्गत बीचवर पोहण्याचे सुरक्षित क्षेत्र दर्शविण्यासाठी फ्लोटिंग बोयाज लावण्यात आले आहेत. जिल्ह्यातील नागाव, आक्षी, काशिद, मुरुड, अलिबाग, वरसोली, मांडवा, हरेश्वर, किहिम, रेवदंडा, कोर्लई या सर्व प्रमुख समुद्र किनाऱ्यांवर हे बोयाज लावण्याचं काम सुरु आहे. येत्या १५ दिवसांत हे काम पूर्ण होईल, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक यांनी लोकमतशी बोलताना दिली.समुद्रात पोहण्याचे सुरक्षित क्षेत्र दर्शवण्यासाठी तसंच धोकादायक पातळी दर्शवण्यासाठी फ्लोटिंग बोयाजचा वापर होतो. समुद्र किनाऱ्याच्या काठापासून साधारणतः ५० ते ६० मीटर अंतरावर किंवा भरती ओहटीच्या पातळ्यांचा अभ्यास करुन व स्थानिकांच्या अनुभवाच्या आधारे ही ठिकाणं निश्चित करण्यात येतात. त्यावर हे बोयाज लावण्याचं काम सध्या सुरु असल्याचं पाठक यांनी पुढे सांगितलं. जिल्ह्यात एकूण ११५ बोयाज बसवण्यात येत आहेत.पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं हा उपयुक्त उपक्रम असून यामुळे पर्यटन वाढीला चालना मिळणार आहे. जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांनाही जिल्हा प्रशासनानं पुरेशी काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. बीचनिहाय भौगोलिक परिस्थिती वेगवेगळी असल्यानं साधारणपणे साडेतीन फूट खोलीच्या पुढे समुद्रात पोहण्यासाठी जाऊ नये. मद्यपान करून पोहू नये. जीव धोक्यात घालून आनंद घेण्याचा प्रयत्न करू नये. आपली स्वत:ची जबाबदारी ओळखून समुद्रात पोहण्यासाठी उतरावं. प्रशासनानं प्रत्येक बीचवर लावलेल्या सुरक्षा सूचना व स्थानिक नागरिकांनी दिलेल्या सूचनांकडे लक्ष द्यावं, असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे.