रेशनचा तरंगणारा तांदूळ प्लास्टीकचा? ग्राहकांना पडला प्रश्न, होतेय चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2023 08:07 AM2023-08-23T08:07:49+5:302023-08-23T08:08:28+5:30
पनवेल पुरवठा विभागाकडून काय मिळालं स्पष्टीकरण, वाचा सविस्तर
लोकमत न्यूज नेटवर्क, नवीन पनवेल : रेशनिंगच्या दुकानात आलेला तांदूळ प्लास्टीकचा असून, तो पाण्यात तरंगत असल्याची ओरड सध्या सुरू आहे. मात्र, प्रत्यक्षात हा तांदूळ फोर्टिफाईड असून, तो पौष्टिक असल्याचे पनवेल येथील पुरवठा विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
पनवेल तालुक्यातील धोदाणीजवळील आदिवासी वाडीतील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात एक तरुण रेशनिंग दुकानातून घेतलेल्या तांदुळातून प्लास्टीकचे तांदूळ असल्याचे सांगत आहे. ते तांदूळ तसे दिसतदेखील आहेत. पाण्यात टाकले असता ते तरंगत असल्याचे व्हिडीओत दिसत आहे. त्यानंतर प्लास्टीक तांदळाची चर्चा वाऱ्यासारखी पसरली.
हे तांदूळ प्लास्टीकचे नसून फोर्टिफाईड आहेत. अधिक पोषण तत्त्वे मिळण्याच्या दृष्टीने हे तांदूळ उपयुक्त आहेत. नियमित तांदुळापेक्षा या तांदुळाचे वजन कमी असल्याने ते पाण्यावर तरंगतात. त्यामुळे नागरिकांमध्ये गैरसमज निर्माण झाला आहे. हे तांदूळ प्लास्टीकचे नसून फोर्टिफाईड असल्याने ते नियमित पद्धतीनेच शिजवावे लागतात. त्यामुळे नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही.
- प्रदीप कांबळे, पुरवठा अधिकारी, पनवेल