रोहा तालुक्यात वादळी पावसाने नुकसान
By Admin | Published: May 14, 2017 10:48 PM2017-05-14T22:48:47+5:302017-05-14T22:48:47+5:30
तालुक्यातील खांब, देवकान्हे विभाग यासह तालुक्यात शुक्र वारी सायंकाळी सातच्या सुमारास जोरदार चक्रीवादळासह गारपीट पावसात अनेकांच्या घरांची पडझड झाली
लोकमत न्यूज नेटवर्क
रोहा : तालुक्यातील खांब, देवकान्हे विभाग यासह तालुक्यात शुक्र वारी सायंकाळी सातच्या सुमारास जोरदार चक्रीवादळासह गारपीट पावसात अनेकांच्या घरांची पडझड झाली, तसेच लग्न मंडप व गुरांचे गोठे उद्ध्वस्त झाले आहेत. सोसाट्याच्या वादळात लग्न मंडपासह घरावरील पाइप व त्यावरील पत्रे, गुरांचे गोठे व काही घरे जमीनदोस्त झाली आहेत.
तालुक्यातील खांब, देवकान्हे, नडवली, तळवली, चिल्हे, धानकान्हे, देवकान्हे या गावांना जोरदार गारपीट पाऊस व चक्र वादळाने मोठा दणका दिला. यामध्ये अनेकांच्या घरांची पडझड झाली असून विद्युत खांब, विद्युत तारा व झाडे कोसळली, मात्र दैव बलवत्तर म्हणून कोणतीही जीवित हानी झाली नाही. चिल्हे येथील शिंदे कुटुंबीयांकडे साखरपुडा कार्यक्र म सुरू असतानाच अचानक चक्र ीवादळ, गारपीट पाऊस सुरू झाल्याने साऱ्यांचीच धांदल उडाली. या कार्यक्र मात उपस्थित बाहेरगावहून आलेली पाहुणे मंडळी व ग्रामस्थांची तारांबळ उडाली तर अनेक घरांची पडझड होवून अतोनात नुकसान झाले आहे.
चिल्हे येथील हरी शंकर महाडिक यांचे घर पूर्णत: पत्र्यासह भिंती कोसळून जमीनदोस्त झाले, तसेच चिल्हे येथील बाळा शंकर महाडिक, तुकाराम महाडिक, हरी गंगाजी लोखंडे, विलास महाडिक, नथुराम महाडिक, जितेंद्र महाडिक, सटू महाडिक, तळवली येथील रघुनाथ कोस्तेकर, अशोक कोस्तेकर, स्वप्नील मरवडे, अजित चितळकर, यशवंत चितळकर व गणेश कुंभार, नडवली येथील पांडुरंग जाधव, एकनाथ पवार, यशवंत लाडगे, वसंत मोकाशी, लक्ष्मी मालुसरे, धानकान्हे येथील नामदेव देवकर यांच्या घरावरील तसेच या विभागातील श्रमिक विद्यालय चिल्हे हायस्कूलचे पाइपांसह पत्रे दोनशे ते तीनशे मीटर अंतरावर उडवून गेले आहेत. चिल्हे, बाहे, मुठवली, गोवे येथील भाजी व्यावसायिक यांचे भाजी शेतीचे तसेच खांब, पुगाव, पुई या विभागातील भात शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. या विभागातील सर्कल अधिकारी तांडेल अण्णा यांच्या मार्गदर्शनाखाली सजा तलाठी नितीन शेळके, ग्रामसेवक पाटील, पोलीस पाटील खेळू मरवडे, ग्रामस्थ रघुनाथ कोस्तेकर, तुकाराम महाडिक, हरी महाडिक व प्रमोद लोखंडे यांच्या उपस्थितीत या उद्ध्वस्त झालेल्या घरांचे, भाजी व भातशेती याचा पंचनामा केला असून लवकरात लवकर शासनाच्या वतीने मदत दिली जाईल, असे सांगण्यात आले.