कुंडलिकेचे रौद्र रूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 02:05 AM2018-07-11T02:05:05+5:302018-07-11T02:05:43+5:30
रायगड जिल्ह्यासह कोकणाला पावसाने झोडपल्याने नद्यांच्या पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. रोह्यातील कुंडलिका नदीने धोक्याची पातळी गेल्या चार दिवसांत पाच वेळा ओलांडली आहे.
रोहा - रायगड जिल्ह्यासह कोकणाला पावसाने झोडपल्याने नद्यांच्या पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. रोह्यातील कुंडलिका नदीने धोक्याची पातळी गेल्या चार दिवसांत पाच वेळा ओलांडली आहे. जिल्हा आपत्कालीन कार्यकक्षाने ४८ तासांत अतिवृष्टीचा इशारा दिल्याची माहिती तहसीलदार सुरेश काशिद यांनी दिली आहे.
रोह्यात शुक्र वारपासून पडणाऱ्या धुवाधार पावसाने शहरात हैदोस घातला आहे. शहरातील मुख्य रस्त्यासह पीडब्ल्यूडी कार्यालय, दमखाडी आणि अष्टमी आदी भागात पाणी शिरले.
प्रशासनाने दिवसभरात वेळोवेळी भोंगे वाजवून नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला.
भिरा व कोलाड येथील डोलवहाल धरणातून पाणी सोडण्यात येण्याची भीती व्यक्त होत आहे. दुपारपासून रोहा अष्टमी पुलाला लागून पाणी वाहू लागले. सायंकाळपर्यंत पावसाची स्थिती अशीच राहिल्यास पुराचे पाणी गावात शिरण्याची भीती व्यक्त होत आहे.
धरणातून पाणी सोडल्यास त्याचा फटका नदीच्या दोन्ही बाजूकडील रोहा अष्टमी शहर आणि लगतच्या गावांना बसणार आहे. रोहा तालुक्यात सतत पाऊस पडत असून नदी, नाले तुडुंब भरले आहेत. पाण्याची वाढत असलेली पातळी लक्षात घेता, तालुका प्रशासनाकडून नदीकिनारी गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
पावसामुळे काही भागातील भातशेती पाण्याखाली गेल्याने शेतकरी चिंतित झाला आहे. शेतीच्या बांधांना खांडी गेल्याने पावसाचे पुराचे पाणी शेतात घुसत आहे, तर काही गावांतील घरामध्ये देखील पाणी शिरले आहे.
नद्यांनी धोक्याची
पातळी ओलांडली
मुसळधार पडत असणाºया पावसामुळे तालुक्यातील कुंडलिका, गंगा, मैसदरा या नद्या धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहेत. त्यामुळे रोहा अष्टमीप्रमाणे काही नदीकिनारील गावांचा संपर्क तुटण्याची शक्यता आहे. शहरात पाणी रस्त्यावर आल्याने वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. कुंडलिका तुडुंब भरून वाहत असल्याने दमखाडी मागील परिसरातदेखील पुराचे पाणी शिरले आहे.
येत्या ४८ तासांत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे, तरी प्रशासन पूर्णत: दक्ष असून महसूल विभागासह पूर नियंत्रण कक्ष सर्वत्र संपर्क ठेवून आहे.२००५ च्या पुराचा अनुभव पाहून प्रत्येक ठिकाणी सहायता गट कार्यरत आहेत, तसेच शासनाचे सर्व विभाग संयुक्तपणे काम करत आहेत.
- सुरेश काशिद,
तहसीलदार, रोहा