महाडमध्ये पुरामुळे नुकसानीचे प्रमाण प्रचंड, घरामध्ये पाणी शिरल्याने अनेक कुटुंबे उघड्यावर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2019 03:13 AM2019-08-12T03:13:48+5:302019-08-12T03:14:00+5:30

गेले आठ दिवस पुराने महाड शहरासह संपूर्ण तालुक्याला वेढा घातला होता. यामुळे वेगवेगळ्या पद्धतीत मोठ्या प्रमाणात नुकसानीचा फटका अनेक गावांना बसला आहे.

flood in Mahad, many families affected | महाडमध्ये पुरामुळे नुकसानीचे प्रमाण प्रचंड, घरामध्ये पाणी शिरल्याने अनेक कुटुंबे उघड्यावर

महाडमध्ये पुरामुळे नुकसानीचे प्रमाण प्रचंड, घरामध्ये पाणी शिरल्याने अनेक कुटुंबे उघड्यावर

Next

- सिकं दर अनवारे
दासगाव  - गेले आठ दिवस पुराने महाड शहरासह संपूर्ण तालुक्याला वेढा घातला होता. यामुळे वेगवेगळ्या पद्धतीत मोठ्या प्रमाणात नुकसानीचा फटका अनेक गावांना बसला आहे. नागरिकांना मनस्तापासोबत आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. येथे पुरामुळे झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याचे काम बहुतेक पूर्ण झाले असले तरी नुकसानीची आकडेवारी निश्चित झालेली नाही. पंचनाम्यामध्ये अद्याप शेतीच्या नुकसानीचे पंचनामे झाले नाहीत. नागरिक मदतीच्या प्रतीक्षेत असले तरी शासनाचे काही निष्कर्ष आड येत असल्याने शहर आणि तालुक्याला एकही रुपया मदत मिळालेली नाही.
२००५ मध्ये महाड तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात पूर येऊन अतिवृष्टी झाली होती. संपूर्ण तालुक्यामध्ये हाहाकार उडाला होता. मात्र, त्यानंतर खबरदारी घेतली होती. १३ वर्षे महाडकर पावसाळ्यामध्ये शांत झोपले. छोटे पूर आले; परंतु काही नुकसान न करता ओसरले. पाऊस येणार लागणार आणि जाणार हा विचार नागरिकांच्या डोक्यात असताना यंदा मात्र पावसाने महाडकरांना चांगलाच फटका दिला आहे. संपूर्ण महाड तालुका पुराच्या पाण्याने जलमय झाला. आठ दिवस पुराचे पाणी महाडमध्ये वेढा घालून बसले होते. १३ वर्षांचा गाफिलपणा यंदा व्यापारी, छोटे-मोठे दुकानदार आणि नदीकाठी असणाऱ्या दुकानदारांना चांगलाच भोवला.
महाडमध्ये पूर ओसरेपर्यंत ३२८७ मि.मी. एवढी पावसाची नोंद झाली. यामध्ये १ ते ८ आॅगस्ट या आठ दिवसांत १२३४ मि.मी. एवढी पावसाची नोंद झाली. या आठ दिवसांच्या पावसामुळे संपूर्ण महाड परिसर आणि शहराला पुराचा वेढा पडला. दरवर्षी छोटे पूर येत असतात. या भ्रमात महाडकर नागरिक राहिले आणि पडणाºया पावसामुळे एकच हाहाकार उडत संपूर्ण महाड जलसंकटात सापडला. तालुका आणि शहर संपूर्ण पाण्याखाली आले. अनेक नागरिक या संकटात सापडले, त्यामुळे एनडीआरएफ यांच्यामार्फत बचावकार्य सुरू करण्यात आले. एनडीआरएफ ने महाड शहर ४००, बिरवाडी ७०, आसनपोई ९०, आके १०, भोराव २५, सव १६, दासगाव ३०, तेटघर १५, काचले ५, कोलोसे १० या दहा ठिकाणांहून ६७१ नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे काम केले. त्याचबरोबर शहर आणि तालुक्यामधील ६१ ठिकाणी पुराचे पाणी घरात शिरून आणि अतिवृष्टीचा फटका बसला. यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानीमध्ये १९४४ घरे, १५०० दुकाने आणि १५ शेतकऱ्यांचे गुरांचे गोठे यांचा समावेश आहे. यामध्ये १५०० दुकाने आणि १५०० घरेही महाड शहरामधीलच आहेत. त्यामुळे आजही शहरातील अनेक दुकाने बंद आहेत. इतर नुुकसानीप्रमाणे दुधाचा व्यापार करणाºया शेतकºयांनाही पुराने सोडले नसून तालुक्यातील गोंडाळे आणि पाली बु. या दोन गावांमधील शेतकºयांच्यातीन म्हैशी व दोन गाई वाहून गेल्याने मोठे नुकसान झाले आहे.

दोन दिवसांत मदत न मिळाल्यास सरकारचा पंचनामा करू - जगताप

महाड : अतिवृष्टीमुळे महाडमध्ये आलेल्या महापुरात नुकसानग्रस्तांना येत्या दोन दिवसांत सरकारने रोख रक्कम वाटप न केल्यास नुकसानग्रस्तांचे पंचनामे करणाºया सरकारचाच पंचनामा करू, असा इशारा रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष माजी आमदार माणिक जगताप यांनी दिला. या महापुरामुळे महाड शहरासह तालुक्यातील व्यापारी, नागरिक तसेच शेतकºयांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पूर ओसरून सहा दिवस लोटले तरी पूरग्रस्तांना कोणतीही नुकसानभरपाई तसेच आपद्ग्रस्त कुटुंबांंपर्यंत अद्यापही शासकीय मदत पोहचलेली नाही. त्यामुळे या आपद्ग्रस्तांमध्ये शासनाच्या या कारभाराबाबत तीव्र संतापाची भावना निर्माण झाली असल्याचे जगताप यांनी सांगितले. ग्रामीण भागातील अनेक रस्ते वाहून गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप माणिक जगताप यांनी केला.
ज्याठिकाणी दोन दिवस पुराचे पाणी असेल त्याच ठिकाणच्या पूरग्रस्तांना शासकीय मदत मिळणार असल्याचा शासकीय आदेश असल्याने या आदेशाची अंमलबजावणी झाल्यास महाडमधील पूरग्रस्तांना शासकीय रोख रक्कम व मदत मिळणे शक्य नाही, त्यामुळे हा निर्णय रद्द करून शासनाने जुलै २००५ च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करून पूरग्रस्तांना मदतीचा हात द्यावा, अशी आग्रही मागणी माणिक जगताप यांनी केली. महाड तालुक्यातील ग्रामीण भागात अतिवृष्टीत नुकसान झालेल्या बिरवाडीसह सावरट,शेवते, माझेरी आदी ठिकाणी जगताप यांनी भेट देऊन स्थानिकांशी चर्चा केली.

रस्त्याचे नुकसान; गावांचा संपर्क तुटला

पावसाने जोर धरल्याने गांधारी आणि सावित्री नद्यांनी अचानक धोक्याच्या पातळ्या ओलांडल्या. त्यामुळे पाडवाडी ते आदिवासीवाडी शहरावरील पूल खचला. बावले गावातील पुलाचे नुकसान झाले. महाडला जोडणाºया दादली पुलाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
त्याचप्रमाणे काही ठिकाणी अतिवृष्टी होत रस्ते वाहून गेले, तर काही ठिकाणी दरडी कोसळल्या. त्यामुळे सांदोशी, बावळे, करमर, कावळेत नाते, सावरट, पुनाडे त नाते निजामपूर, पाचाड, निगडे, पिंपळवाडी, माझेरी, वरंध, पारमाची, शिवथर घळ, कोंझर या गावातील २५०० ग्रामस्थांचा संपर्क तुटला, आजही तीच अवस्था आहे.
त्याचप्रमाणे कसबे शिवथर, अंबेनळी, सोलमकोंड, धबागडवाडी या गावांमध्ये काही ठिकाणी डोंगराला भेगा पडल्या. काही ठिकाणी घरांना तडे गेले तर काही ठिकाणी धोका निर्माण झाला, त्यामुळे या गावातील ७२ कुटुंबांतील २४२ नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले.

शेती सोडून महाडमध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पुराच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले असून काही बंद घरे आणि दुकानांचे शिल्लक आहेत. उद्यापासून शेतीच्या पंचनाम्यांना सुरुवात करण्यात येईल.
- विठ्ठल इनामदार, प्रांताधिकारी, महाड

शहरामध्ये अचानक पाणी भरण्यास सुरुवात झाली. मोठ्या प्रमाणात पाण्यात वाढ होईल, एवढी कल्पना नसल्याने दक्षता म्हणून गोडाऊनमधला तांदूळ व इतर मसाले व सामान चार फूट उंचीवर उचलून ठेवले. पाण्याचा जोर वाढला आणि सर्व सामान पाण्यामध्ये गेले. जवळपास साडेतीन लाखांचे नुकसान झाले.
- दिनेश तलाठी, दुकानदार

2005
मध्ये झालेल्या अतिवृष्टीनंतर दरवर्षी महाड तालुक्यातील अनेक गावांच्या पावसाळ्यापूर्वी महाड आपत्ती व्यवस्थापन आणि महसूल विभागाकडून बैठक घेत दक्षतेच्या सूचना देण्यात येत असतात. १३ वर्षे अशीच गेली.

13
वर्षे महाडकरांनी २००५ सारखा पूर पाहिला नाही. २००५ मधील नुकसान महाडकर नागरिक विसरून गेले होते. या पुराने महाडकरांना पुन्हा जुनी आठवण करून दिल्याने भीतीचे वातावरण निर्माण करून दिले. पुराचे पाणी जरी नद्यांना जाऊन मिळाले असले तरी चार दिवस उलटून गेले.

आजही महाडची बाजारपेठ ५० टक्के बंद आहे. संपर्क तुटलेले गावही आज त्याच परिस्थितीत आहेत.
प्रशासनाने युद्धपातळीवर पंचनामे सुरू केले असून पंचनामे पूर्ण झाल्याचे दावे करत असले तरी आज शेतीच्या नुकसानीचे पंचनामे अद्याप झालेले नाहीत.
आलेल्या पुरामध्ये किती नुकसान झाले हेही आज निश्चित झालेले नाही. मात्र, आलेल्या पूर आणि अतिवृष्टीमुळे नागरिकांची झोप
उडाली आहे.

Web Title: flood in Mahad, many families affected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.