सावित्री नदीच्या पुराचे पाणी महाड शहरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2020 05:34 AM2020-08-05T05:34:43+5:302020-08-05T05:35:15+5:30
सावित्री नदीचे पुराचे पाणी महाडमधील भोईघाट येथून सुकट गल्लीमध्ये शिरले. यामुळे मुख्य बाजारपेठेत पुराचे पाणी दाखल झाल्यामुळे व्यापारी आणि नागरिकांची तारांबळ उडाली.
दासगाव : महाड तालुक्यात सोमवारपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे सावित्री, काळ, आणि गांधारी या नद्या तुडुंब भरून वाहू लागल्या आहेत. यामुळे महाड शहरात, तसेच ग्रामीण भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. मंगळवारी सकाळपासूनच शहरात विविध भागांत सावित्री नदीचे पाणी शिरल्याने नागरिक, व्यापारी धास्तावले आहेत.
सावित्री नदीचे पुराचे पाणी महाडमधील भोईघाट येथून सुकट गल्लीमध्ये शिरले. यामुळे मुख्य बाजारपेठेत पुराचे पाणी दाखल झाल्यामुळे व्यापारी आणि नागरिकांची तारांबळ उडाली. त्याचप्रमाणे, दस्तुरी नाका येथेही पाणी वर आल्याने सकाळपासूनच दस्तुरी नाका ते नातेखिंड हा मार्ग पाण्याखाली असल्याने वाहतुकीस बंद ठेवण्यात आला. केंबुर्लीनजीक असलेल्या गांधारी पुलावरून पुराचे पाणी गेल्याने, महाड शहरात येणारी वाहतूक ठप्प झाली होती. दासगाव परिसरातही मोठ्या प्रमाणात सावित्री खाडीतील पाणी शेतीमध्ये घुसल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
दादली पुलावरून नदीचा प्रवाह, नदीपलीकडील गावांचा संपर्क तुटला
१महाड : पावसाचा जोर मंगळवारी सायंकाळी कायम राहिल्याने महाड शहरासह नदीकाठच्या गावांना पुराचा धोका वाढला आहे. सावित्री नदीच्या पातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असून, या नदीवरील दादली पुलावरून या नदीचा प्रवाह सायंकाळी वाहू लागल्यामुळे महाडवासीयांची भीती वाढली आहे, तर या पुलावरून वाहतूक बंद झाल्याने नदीपलीकडील अनेक गावांचा महाड शहराची संपर्क तुटला आहे.
२महाड शहरांमध्ये गांधारी नाका आणि दस्तुरी नाका या मार्गाने शहरांत प्रवेश करता येतो, परंतु मंगळवारी पुराचे पाणी रस्त्यावर आल्याने दोन्ही मार्ग वाहातुकीसाठी बंद आहेत. सावित्री नदीची पाण्याची धोका पातळी ६.५० मिटर असून, ही धोक्याची पातळी नदीने ओलांडली असून, सकाळी ९ वाजता पातळी ७.३० मीटर झाली होती. मुसळधार पावसाने महाड तालुक्यात पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने, नगरपरिषद, महसूल प्रशासन, पंचायत समितीने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.
चोवीस तासांत
१ हजार ८५१.४० मिमी पावसाची नोंद
च्सोमवार, ३ आॅगस्टला दिवसभर पावसाची संततधार सुरू होती, तर सायंकाळी या पावसाचा जोर वाढला होता. त्यामुळे सोमवारी सकाळी ८ ते मंगळवार ४ आॅगस्ट रोजी सकाळी ८ या चोवीस तासांत १ हजार ८५१.४० मिमी पावसाची नोंद झाली आहे. ११५.७१ मिमीच्या सरासरीने हा पाऊस नोंदविला गेला आहे. यामध्ये दक्षिण रायगडात पावसाचा जोर जास्त होता.
च्रोह्यात सर्वाधिक १९८.०० मिमी पाऊस पडला. त्या खालोखाल पोलादपूर तालुक्यात १९७ मिमी, म्हसळ्यात १६५ मिमी, माणगाव व सुधागडमध्ये १६० मिमी, तळा तालुक्यात १२६ मिमी पाऊस पडला. उरणमध्ये १३४ मिमी, अलिबाग ७९ मिमी, पेण ६० मिमी, मुरुड ९२ मिमी, पनवेल ७२ मिमी, कर्जत ६०.६० मिमी, खालापूर ६५ मिमी, महाड ९७ मिमी, श्रीवर्धन ९८ मिमी, माथेरान ८७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. या पावसाबरोबर जोरदार वारे वाहत आहेत.
रायगड जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस
लोकमत न्यूज नेटवर्क
अलिबाग : रायगड जिल्ह्यात ४ ते ६ आॅगस्टदरम्यान मुसळधार पावसाची शक्यता असून, अशी पूर्वसूचना प्रादेशिक हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे नदी परिसरातील नागरिकांना जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून, महाड तालुक्याला सतर्कतेचा इशारा दिला आहे, तर कुंडलिका आणि आंबा नदीने इशारा पातळी ओलांडली आहे.
सोमवारपासून कोसळणाऱ्या पावसामुळे महाडमधील सावित्रीने धोका पातळी ओलांडली आहे, तर रोह्यातील कुंडलिका व आंबा या नद्या दुथडी भरून वाहत आहेत. त्यात मंगळवारपासून तीन दिवस अतिवृष्टीची शक्यता असल्याने, नदीच्या आसपासच्या परिसरातील नागरिकांना जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे, तसेच दरडग्रस्त, सखल भागातील नागरिकांनी योग्य वेळी सुरक्षित ठिकाणी जाऊन स्थलांतर करावे. आवश्यक असल्यासच घराबाहेर पडावे. पुराच्या पाण्यातून वाहने चालवू नयेत, विद्युत खांब, स्विच बोर्ड, इलेक्ट्रिक वायर्स यांना हात लावू नये, यापासून दूर राहावे. स्थानिक प्रशासन करीत असलेल्या उपाययोजनांना सहकार्य करावे, त्यांच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे. नागरिकांनी घाबरून न जाता स्थानिक प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केले आहे. उत्तर कोकणात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने हे जोरदार वारे वाहत असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.