अलिबाग : रायगड जिल्ह्यात रात्रीपासून मुसळधार पावसाने जिल्ह्याला झोडपले असून अनेक भागात नद्या ओसंडून वाहू लागल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. रोहा शहरातील कुंडलिक नदीने धोक्याची पातळी ओलांडली असल्याने शहरात अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. महाड शहरात ही काही भागात पाणी चढले आहे. जिल्ह्याला रेड अलर्ट दिला असल्याने रोहा, श्रीवर्धन, माणगाव, महाड, पोलादपूर तालुक्यातील शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. रोहा शहरात पूरस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांना आणि यंत्रणेला सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
रायगडात गेले दोन दिवस मुसळधार पाऊस पडत आहे. हवामान विभागाने २३ जुलै रोजी २४ तास अतिवृष्टी काही भागात होण्याचा इशारा दिला होता. रात्रीपासून पावसाचा जोर वाढला असल्याने अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अलिबाग, रोहा, महाड, पाली, खालापूर, माणगाव, पोलादपूर, खालापूर तालुक्यात पावसाचा जोर वाढलेला आहे. कुंडलिका, अंबा, सावित्री नद्या ओसंडून वाहू लागल्या असल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास पुराचा अधिक धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
जिल्ह्यातील पूरस्थिती बाबत जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर असल्याने सर्व यंत्रणेला सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. एनडीआरएफ पथक ही तैनात ठेवण्यात आलेले आहे.
हे मार्ग वाहतुकीस बंद
सुधागड तालुक्यात पाऊस जोरात सुरू असुन पाली ते वाकण रोडवरील अंबा नदीचे पुलाच्या दोन्ही बाजूस रोडवरून पाणी जात आहे, खबरदारी म्हणून पुलावरील वाहतूक पोलीस बंदोबस्त ठेवून बंद करण्यात आली आहे.
पुणे - रायगड मार्गावरील ताम्हिणी घाटात दरड कोसळल्यामुळे घाटातून वाहतूक बंद करण्यात आली आहे. घाट साधारण ४-५ तास बंद राहिल असा अंदाज आहे.
परीक्षा पुढे ढकलल्या
रायगड जिल्ह्यातील वरिल तालुक्यातील अतिवृष्टीमुळे जाहीर झालेल्या सुट्टीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थीहित लक्षात घेता व संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी मुंबई विद्यापीठाच्या आज सकाळी आणि दुपारच्या सत्रात होणाऱ्या फक्त या तालुक्यातील सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या सर्व परीक्षांच्या सुधारित तारखा लवकरच जाहीर केल्या जातील.