पुरामुळे सहा गावांचा संपर्क तुटला, अलिबागमधील रामराज नदीला पूर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2019 12:00 AM2019-07-02T00:00:33+5:302019-07-02T00:00:57+5:30
गेल्या पाच दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. जिल्ह्यातील नद्या दुथडी भरून वाहत आहेत.
अलिबाग : रायगड जिल्ह्यात सातत्याने बरसणाऱ्या पावसाने चांगलेच थैमान घातले आहे. रामराज नदीला पूर आल्याने गावातील सर्वच प्रमुख रस्ते पाण्याखाली गेले होते. त्यामुळे परिसरातील सहा गावातून कोणतेच वाहन बाहेर गेले नाही, अथवा गावात येऊ शकले नसल्याने नागरिकांना कामानिमित्त बाहेर पडताच आले नाही. गावातील नागरिकांचा तालुक्यापासून संपर्क तुटला होता. दुपारनंतर पावसाने विश्रांती घेतल्याने नदीचे पाणी कमी झाले. त्यानंतर जनजीवन पूर्वपदावर आले.
गेल्या पाच दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. जिल्ह्यातील नद्या दुथडी भरून वाहत आहेत.
अलिबागपासून सुमारे २२ किमी अंतरावर रामराज गाव आहे. सातत्याने पडणाºया पावसामुळे नदीतील पाणी आजूबाजूच्या शेतासह रस्त्यावर आले आहे. रामराज, उमटे, भिलजी, बोरघर, मोरखोल आणि नांगरवाडी या गावांचा तालुक्यापासून संपर्क तुटला होता. या गावाची एकूण लोकसंख्या सुमारे साडेतीन हजार आहे. गावात सकाळपासून एकही वाहन आले नाही, अथवा गावाच्या बाहेर गेले नाही. रस्तेच पाण्याखाली गेल्याने काहीच दिसत नव्हते. सर्वत्र पाणीच पाणी झाले होते.
सकाळी कामानिमित्त तसेच शाळा, महाविद्यालयात जाणाऱ्यांचे हाल झाले. नदीचे पाणी वाढल्याने अलिबागकडून जाणारी एसटी बसही बोरघर गावाबाहेरच थांबवण्यात आली होती. त्याचप्रमाणे विक्रम मिनीडोर, दुचाकी वाहनेही याच ठिकाणी थांबली होती. नदीचा प्रवाह वाढल्याने वाहन घेऊन गावात जाण्याचे अथवा गावातून बाहेर येण्याचे धाडस कोणी केले नाही. काहींनी काठीचा आधार घेत रस्ता शोधण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले. दुपारी रामराजमधील प्रमुख रस्त्यावर मोठे झाड कोसळले होते. गावातील नागरिकांनी पुढाकार घेत भरपावसामध्ये काम करून झाड तोडून रस्ता मोकळा केला. दुपारनंतर नदीचे पाणी कमी झाल्यावर काही प्रमाणात वाहतूक सुरळीत सुुरू झाली.
मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यावर नदीला पूर येण्यासारखी परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे नदीचे पाणी हे रस्त्यांसह शेतात आणि घरातही घुसते. रात्री पाऊस पडल्यावर आम्हाला सावध राहावे लागते असे गावातील नागरिकांचे म्हणणे आहे. पाऊस चांगला झाल्याने आता शेतांच्या कामांना सुरुवात होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
धुवाधार पावसाने वृक्ष कोसळला
दिघी : श्रीवर्धन - बोर्लीपंचतन मार्गावर असुफ येथे सोमवारी वृक्ष कोसळल्याने वाहतूक काही काळ खोळंबली होती. दिघी सागरी पोलीस ठाण्याचे वाहतूक पोलीस शशिकांत बोकारे, नरेंद्र थळे व ग्रामस्थांच्या सहकार्याने वृक्ष बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. श्रीवर्धन तालुक्यामध्ये धुवाधार पावसाने सोमवारपासून पुन्हा सुरुवात केली आहे. आतापर्यंत श्रीवर्धन - बोर्लीपंचतन रस्त्याला तिसºयांदा वृक्ष कोसळल्याची घटना घडली आहे.
लोणेरेजवळ पुलाचा कठडा तुटला
माणगाव : मुंबई-गोवा महामार्गावर मौजे लोणेरेनजीक महाडकडे जाणाºया रस्त्यावरील पुलाची साइडपट्टीसह कठडा रविवारी सायंकाळी खचला. यामुळे वाहतुकीसाठी पूल धोकादायक ठरला आहे. पोलिसांनी किरकोळ डागडुजी केली असली तरी धोका टळलेला नाही.
संततधार पावसामुळे रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास लोणेरेकडून महाडकडे जाणारा महामार्गावर असणारा पुलाचा कठडा साइडपट्टीसह खचला. हे वाहतूक पोलिसाच्या लक्षात येताच महामार्गाचे काम करणाºया कंत्राटदार कंपनीकडून पुलाची डागडुजी करून वाहतुकीस सुरळीत करण्यात आली.
सध्या जरी डागडुजी केली असली तरी भविष्यात हा धोका कायम असणार आहे. तरी नवीन पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करून पूल वाहतुकीसाठी खुला करावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.
पावसाची संततधार;
१९० मि. मी. पावसाची नोंद
नागोठणे : शहरासह विभागात पावसाची संततधार चालूच असून गेल्या चोवीस तासात नागोठणे शहरात १९० मि. मी. पावसाची नोंद झाल्याची माहिती तलाठी सजाचे अनंत म्हात्रे यांनी दिली. रात्रभर पडलेल्या पावसाने नागोठणे पोयनाड मार्गावर कडसुरे - कुहिरे गावांदरम्यान रस्त्यावर पाणी साचल्याने सकाळी सहा - सात दरम्यान रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती. येथील अंबा नदी दुथडी भरून वाहत असून पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास पुराची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पनवेल तालुक्यातील आदिवासीवाडी पाण्यात
पनवेल तालुक्यातील एचओसी आदिवासी वाडीत पाणी शिरले. १५ ते २० घरांची लोकवस्ती असलेल्या या आदिवासी वाडीत साचलेले पाणी बाहेर काढण्यासाठी केवळ एकच पंप कार्यान्वित होता. पनवेल तालुका क्रीडा संकुलाच्या समोरच ही आदिवासी वाडी आहे. या परिसरात करण्यात आलेल्या भरावामुळे ही परिस्थिती उद्भवली होती. पनवेल महापालिकेकडूलन सक्षम असे आपत्ती व्यवस्थापन केंद्र उभारण्यास पालिकेला अपयश आल्याचे पहावयास मिळाले आहे.
माणगावातील रस्ते पाण्याखाली
माणगाव : सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने माणगावामधील अनेक भागातील रस्ते पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे शहरातील नालेसफाईची पोलखोल झाली आहे.
माणगाव उपजिल्हा रुग्णालयात पाणीच पाणी साचले असून खालच्या भागातील रुग्णांना वरच्या मजल्यावर हलवावे लागले. मुंबई-गोवा महामार्गालगत गटारांमध्ये चिखलयुक्त गाळ साचला आहे. त्यामुळे गटारे तुंबली असून पाणी रस्त्यावर आले आहे.
मोर्बा श्रीवर्धनकडे जाणारा रस्त्याचे रुंदीकरण सुरू आहे. त्यामुळे उपजिल्हा रुग्णालयात पाणी शिरले संबंधितांनी जेसीबीचा वापर करून पाणी जाण्यासाठी वाट मोकळी केली.