नेरळ : कर्जत तालुक्यातील नद्यांनी रुद्र रूप धारण केले असून सतत कोसळणाऱ्या पावसामुळे अनेकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. उल्हासनदी, चिल्हारनदी आणि पोशीर नदीने महापुराचा उचांक गाठला असून अनेक रस्ते, पूल पाण्याखाली गेले आहेत. अनेक गावांमध्ये पाणी शिरले असून सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे.यावर्षी सतत तीन वेळा नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली. उल्हास नदीवरील दहिवली पूल तिसºया वेळेस पाण्याखाली गेला आहे, तसेच धोमोते, वंजारपाडा, पोही, अवसरे, तळवडे, कशेळे आदी रस्त्यावरून पाणी गेल्याचे वाहतूक बंद झाली आहे. सर्व रस्ते पूल पाण्याखाली आल्याने सुमारे १०० हून अधिक गावांचा संपूर्ण तुटला आहे, तसेच या महापुरामुळे अनेक रस्ते खचल्याने वाहतूक सेवा ठप्प झाली आहे. अनेक ठिकाणी नाल्या वाहून गेल्या आहेत तर शेतीचे बांध फुटून आणि रस्ते खचून, लावलेली शेती वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.बांधकाम व्यवसायिकांच्या मनमानी कारभारामुळे कधी न जाणाºया रस्त्यांवरून देखील पाणी गेले आहे. तसेच काही गावांमध्ये पाणी शिरले आहे. बिरदोले गावात पाणी शिरून जिल्हा परिषद शाळेत वर्ग खोल्यांमध्ये पाणी शिरले आहे. नेरळ-शेलू दरम्यान रेल्वे ट्रक खचले आहेत. नेरळ कळंब रस्त्यावरील माले पूल सुमारे १० मीटरपर्यंत खचला आहे. तसेच नेरळ-कोल्हारे रस्ता देखील खचल्याने या रास्तावरून वाहतूक बंद आहे. एकूणच पावसाने सर्वत्र दाणादाण उडवली आहे. अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. परंतु जे रस्ते खचले आहेत त्या रस्त्यावर वाहतुकीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.उल्हास नदीच्या पाण्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने कोल्हारे, बिरदोले, हंबरपाडा, बामचामळा आदी गावांमध्ये पाणी शिरले आहे. त्यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. एकूणच पावसाने रस्ते, पूल, वाहने, ट्रेन अशा अनेक साधनांचा मार्ग बंद आहे. त्यामुळे कुठे किती नुकसान झाले आहे हे पाऊस आणि पूर ओसरल्यावर कळेल; अशा पुरात सावधगिरी बाळगावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.कोतवालनगर परिसरातील इमारती, बंगाल्यांमध्ये पाणीच पाणीशहरातील कोतवालनगर परिसरातील विशाल अपार्टमेंट या इमारतीच्या परिसरात सुमारे साडेचार - पाच फुट पाणी होते. त्यामुळे त्या इमारतीमधील तळमजल्यात राहणाºया लोकांनी गच्चीवर आश्रय घेतला. या परिसराला लागून असलेला चौक-कर्जत- मुरबाड रस्त्यावरून नदीचे आलेले पाणी वाहत होते.येथील हरपुडे, डॉ. फडके, भोपतराव आदींच्या बंगल्यामध्ये तर शनी मंदिर, इंदिरा नगर, बामचा मळा नानामास्तर नगर, रेव्हन्यू कॉलनी या परिसरात पाणी साठल्याचे मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी सांगितले. ज्या नागरिकांच्या घरात पाणी घुसले त्यांना नगरपरिषदेच्यावतीने फूड्स पॅकेट देण्यात आली.ज्ञानदीप सोसायटी, मालवाडी परिसर तसेच नेरळ, जिते, आसल आदिवासी वाडी, हेदवली, बेडसे, शेलू या परिसरात पाणी घुसले आहे, जिते गावात ग्रामस्थ अडकले होते त्यांना बाहेर काढाले, कोढींबे येथे घर पडले तर बेडसें गावातील एका शेतकºयांची म्हैस वाहून गेल्याचे गटविकास अधिकारी बालाजी पुरी यांनी सांगितले.कर्जत तालुक्यात २८८.८ मिमी पाऊस३ आॅगस्ट रोजी कर्जत तालुक्यात २८८.८ मिमी पाऊस पडला असून आतापर्यत ३०६०.४ मिमी पावसाची नोंद झाली आहे अशी माहिती तहसील कार्यालयातून मिळाली. तालुक्यात तहसीलदार अविनाश कोष्टी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल घेरडीकर, गटविकास अधिकारी बालाजी पुरी, नायब तहसीलदार संजय भालेराव, शहरामध्ये मुखाधिकारी रामदास कोकरे, पोलीस निरीक्षक अरुण भोर हे फिरून पाहणी करत आहेत, लागेल त्या मदतीची उपाययोजना करत आहेत.वीज पुरवठा खंडितनानामास्तर नगर, कोतवालनगर, आनंद नगर, या परिसरात पाणी साठल्याने त्या ठिकाणच्या इमारतीचे मीटर पाण्यात असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून त्या परिसरातील ट्रान्सफार्मर वरील वीज पुरवठा बंद करण्यात आला. गुंडगे कातकरी वाडी येथील एलटी लाईनचे तीन खांब पडले तसेच गणेगाव चिंचवली, गौळवाडी या परिसरातील खांब वादळी पावासामुळे पडले आहेत त्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला आहे. त्या परिसरातील काम पूर्ण झाले तसा वीज पुरवठा सुरू करण्यात येईल अशी माहिती वीज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता आनंद घुले यांनी दिली.
कर्जत तालुक्यातील उल्हास, चिल्हार, पोशीर नद्यांना पूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2019 12:48 AM