पर्यटन व्यवसायातील वृद्धीसाठी पायाभूत सुविधांवर भर; किनारा सुशोभीकरणावरही लक्ष केंद्रित
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2019 11:45 PM2019-05-14T23:45:24+5:302019-05-14T23:46:39+5:30
पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या ठरणाऱ्या पायाभूत सुविधा उभारण्यावर अलिबाग नगरपालिकेने विशेष भर देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. यामुळे पर्यटन व्यवसायाला नवा आयाम मिळून आर्थिक गतिमानता लाभण्यास मदत होईल.
- आविष्कार देसाई
अलिबाग : पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या ठरणाऱ्या पायाभूत सुविधा उभारण्यावर अलिबाग नगरपालिकेने विशेष भर देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. यामुळे पर्यटन व्यवसायाला नवा आयाम मिळून आर्थिक गतिमानता लाभण्यास मदत होईल.
शहरात अंतर्गत रस्त्यांचे जाळे निर्माण करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात येत आहेत. वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी यासाठी नगर परिषदेने सुमारे ४५० मीटरचे काँक्रीटचे रस्ते निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी तब्बल २ कोटी ५४ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत, तर डांबरीकरणासाठी सुमारे ७१ लाख रुपये खर्च करून सुमारे १,२८० मीटरच्या रस्त्यांचे जाळे निर्माण करण्यात आले आहेत.
अलिबागमध्ये वर्षभर पर्यटक येत असतात. मुंबई-पुण्यासाठी राज्यातील अन्य भागांतूनच नव्हे तर विदेशी पर्यटकही याठिकाणी मोठ्या संख्येने येतात. त्यामुळे येथील हॉटेल, लॉजिंग, रेस्टारंट, कॉटेजेस यांचा व्यवसाय तेजीत असतो. पर्यटकांना आवश्यक सोयी-सुविधा योग्यरीतीने दिल्या तर, पर्यटकांच्या संख्येत आणखी वाढ होईल. त्यादृष्टीने नगर परिषदेने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे.
पर्यटकांना पर्यटनस्थळी पोचण्यासाठी प्रामुख्याने पायाभूत सुविधांची अत्यंत गरज असते. त्यामुळे रस्ते सुस्थितीत करण्यावर भर दिला आहे. अलिबाग तालुका एमएमआरडीएच्या कार्यक्षेत्रात येतो. याच एमएमआरडीच्या माध्यमातून रस्ते निर्माण करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे पावसाळा सुरू होण्यापूर्वीच डांबरीकरणाचे काम संपवण्यात आले आहे. त्यामुळे रस्ते दीर्घकाळापर्यंत टिकण्याचा प्रशासनाने दावा केला आहे.
सिमेंट काँक्रीटचे रस्ते
सेंट मेरी कॉन्व्हेंट स्कूल ते मारुती मंदिर-चेंढरे
२०० मीटर । एक कोटी २२ लाख रुपये
बालाजी नाका ते महावीर चौक
२५० मीटर । एक कोटी ३२ लाख रुपये
डांबरीकरणातून उभारण्यात आलेले रस्ते
शेतकरी भवन ते ठिकरुळ नाका
३०० मीटर । १८ लाख रुपये
ब्राम्हण आळी ते राम मंदिर
२५० मीटर । १२ लाख रुपये
महावीर चौक ते राम मंदिर
१६० मीटर । ७ लाख रुपये
तळकर नगर ते राम मंदिर
१६० मीटर । ७ लाख रुपये
जिल्हा परिषद ते तुषार सरकारी विश्रामगृह
६० मीटर । ४ लाख रुपये
पत्रकार भवन ते जेएसएम कॉलेज मैदान, समुद्र किनारा
५० मीटर । ३ लाख रुपये
जुने भाजी मार्केट-पापाभाई पठाण चौक ते नवीन पोस्ट आॅफिस
३०० मीटर । १८ लाख रुपये