डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर
By Admin | Published: September 12, 2016 03:17 AM2016-09-12T03:17:01+5:302016-09-12T03:17:01+5:30
पनवेल शहरात डेंग्यू यासारख्या साथीचे आजार उद्भवू नये, याकरीता पालिकेचा आरोग्य विभाग आणि ग्रामीण रुग्णालयाने विशेष मोहीम हाती घेतली आहे.
अरुणकुमार मेहत्रे , कळंबोली
पनवेल शहरात डेंग्यू यासारख्या साथीचे आजार उद्भवू नये, याकरीता पालिकेचा आरोग्य विभाग आणि ग्रामीण रुग्णालयाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार घरोघरी जाऊन सर्व्हेक्षण करण्यात येणार आहे. डासांची उत्पत्ती होऊ नये याकरीता ठिकठिकाणी प्रतिबंधात्मक फवारणी तसेच जनजागृतीही करण्यात येत आहे. मोहिमेसाठी १० आरटी वर्कर्सची नियुक्ती करण्यात आली आहे. रोग झाल्यानंतर धावपळ करण्यापेक्षा तो होऊ नये याकरीता ही उपाययोजना हाती घेण्यात आल्याचे पालिका आणि ग्रमीण रुग्णालयाकडून सांगण्यात येत आहे.
पावसाळयात साथीच्या आजारांची प्रमाण वाढते. विशेष करून डेंग्यू मलेरियाच्या रुग्णांवर वाढ होते. यंदाही पनवेल शहरात तीन डेंग्यू सदृश्य रूग्ण आढळले आहे. हे प्रमाण इतर ठिकाणांच्या तुलनेत कमी असले तरी तीव्रता वाढू नये, याकरीता विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. मुख्याधिकारी मंगेश चितळे यांच्या आदेशानुसार, साथीचे आजार होवू नये, याकरीता पालिका प्रशासनाकडून दक्षता घेण्यात येत आहे.
शहरांतील घराघरांत जाऊन आरटी वर्क र्स तपासणी करीत आहेत. याशिवाय घरातील फुलदाण्या, ड्रम, टाक्या, कुंडया, शो-पीस , प्लास्टिक, फ्रीजरची तपासणी करण्यात येत आहे. डेंग्यू, मलेरियाच्या डासांची व्युत्पत्ती याच ठिकाणी होत असून त्यामुळे रोगाची लागण होती, हे नागरिकांना पटवून देण्यात येत आले. त्याचबरोबर कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन आर.टी वर्कर्सच्या माध्यमातून करण्यात येत आहे.
डोअर टू डोअर तपासणीचा अहवाल पनवेल पालिकेला सादर करण्यात आला आहे. त्यानुसार एकूण दहा जणांना आरोग्य विभागाने नोटीसा धाडण्यात आल्या आहेत. प्रशिक्षित पथक तयार करून त्यांच्या माध्यमातून औषध फवारणी करण्याचे कामही हाती घेण्यात आले आहे. डेंग्यूकरीता पॅराथाम लिक्वीडची फवारणी करून अळया मारण्यात येत आहे. त्यासाठी पालिका प्रशासनाकडे फवारणी मशिन्सची संख्याही वाढवली आहे. या व्यतिरिक्त पत्रक, बॅनर्स लावून पनवेलकरांमध्ये जागृती करण्यात आले. नगराध्यक्षा चारूशीला घरत, मुख्याधिकारी मंगेश चितळे, आरोग्य सभापती मनोहर म्हात्रे, ग्रामीण रूग्णालयाचे अधीक्षक बी.एस लोहारे, आरोग्य निरिक्षक दिलीप कदम,दौलत शिंदे, शैलेश गायकवाड, संगिता आंबोलकर याबाबत विशेष लक्ष ठेवून आहेत.
रस्त्यालगत साचलेला पाला-पाचोळा, डेब्रिज, प्लास्टिकच्या पिशव्या उचलणे, नाले, गटारांची साफसफाई, झाडे झुडप, गवताची छाटणी करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे . मलेरिया आणि डेंग्यूबाबत जनजागृती करण्यात येत आहे. आपले घर, सोसायटी आणि परिसराची स्वच्छता कशी ठेवावी, याबाबत प्रबोधन करण्यात येत असल्याचे आरोग्य विभागकडून सांगण्यात आले.