शेतकरी कर्जमाफीकरिता शेकापने केला पाठपुरावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2017 02:05 AM2017-08-03T02:05:48+5:302017-08-03T02:05:48+5:30
राज्यात पुरोगामी विचार टिकवण्याचे काम शेतकरी कामगार पक्षाने केले आहे. राज्याच्या राजकारणात देखील शेकापची भूमिका नेहमीच निर्णायक राहिली आहे.
नेरळ : राज्यात पुरोगामी विचार टिकवण्याचे काम शेतकरी कामगार पक्षाने केले आहे. राज्याच्या राजकारणात देखील शेकापची भूमिका नेहमीच निर्णायक राहिली आहे. शेतकरी कर्जमाफीकरिता शेकापने सातत्याने पाठपुरावा केला. परिणामी शेतकºयांना सरसकट कर्जमाफी मिळावी यासाठी स्थापन झालेल्या सुकाणू समितीमध्ये देखील सरकारला शेकापला स्थान द्यावे लागल्याचे प्रतिपादन शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी केले. शेतकरी कामगार पक्षाचा ७० वा वर्धापन दिन २ आॅगस्ट रोजी कर्जत तालुक्यातील नेरळ शहरात साजरा करण्यात आला, यावेळी आ.पाटील बोलत होते.
कोकण पदवीधर मतदार संघासह यंदा झालेल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शेकापने बाजी मारली आहे. विजयाची ही परंपरा कायम ठेवण्यासाठी कार्यकर्त्यांनी कटिबद्ध राहावे, असे आवाहन करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना सन १९२५ मध्ये झाली आणि देशाला स्वातंत्र्य सन १९४७ ला मिळाले, मात्र देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत या बावीस वर्षात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा एकही हुतात्मा झाला नाही किंवा स्वातंत्र्य लढ्यात त्यांचा काही सहभाग राहिला नाही. ब्रिटिशधार्जिणी भूमिका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने त्यावेळी स्वीकारल्याने ही परिस्थिती होती, हा इतिहास विचारात घेतला पाहिजे, असे प्रतिपादन आ.जयंत पाटील यांनी
के ले.
यावेळी आमदार बाळाराम पाटील यांनी प्रास्ताविकात मागील काळात पार पडलेल्या सर्व निवडणुकांमध्ये पक्षाने देदीप्यमान कामगिरी केली. कर्जत, माणगाव, पनवेल या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत पक्षाला चांगले यश मिळाले, तसेच अलिबाग, पेण, उरण खोपोली, मुरु ड व श्रीवर्धनमध्येही पक्षाला चांगले यश मिळाले असून जिल्हा परिषद निवडणुकीत ५९ जागांपैकी २३ जागांवर विजय मिळविण्यात यश आले, त्याबद्दल जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांचे त्यांनी आभार मानले. त्यानंतर अनेक तालुका आणि जिल्हा चिटणीस पदांवर नियुक्त्या केलेल्यांची नावे जाहीर यावेळी करण्यात
आली.
यावेळी आमदार बाळाराम पाटील,आमदार धैर्यशील पाटील, माजी आमदार विवेक पाटील, माजी मंत्री मीनाक्षी पाटील, जे. एम. म्हात्रे, रायगड जिल्हा परिषद उपाध्यक्ष आस्वाद पाटील, अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.