अलिबाग : जिल्ह्यात ९ ते २३ जानेवारी या कालावधीत २८वा राष्ट्रीय रस्ता सुरक्षा पंधरवडा व अभियान राबविण्यात येत आहे. यात जिल्ह्यातील वाहनचालकांनी वाहतुकींच्या नियमांचे पालन करून आपली व आपल्या परिवाराची सुरक्षा जपावी, असे आवाहन रायगडच्या जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले यांनी सोमवारी येथे केले. जिल्हाधिकारी कार्यालयात या पंधरवड्याचा शुभारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी त्या बोलत होत्या. रस्ता सुरक्षा पंधरवडानिमित्त सर्वांना सुरक्षेबाबत शुभेच्छा देऊन जिल्हाधिकारी म्हणाल्या, ‘वाहतुकींच्या नियमांचे पालन जर सर्वांनी केले, तर निश्चितच सुरक्षेच्यादृष्टीने ते महत्त्वाचे ठरेल. वाहन चालवताना रस्त्यावरून जाणाऱ्या पादचाऱ्यांच्या सुरक्षेची, तसेच आपल्या स्वत:च्या सुरक्षेची काळजी घेणे आवश्यक आहे. यात रस्ता सुरक्षा पंधरवड्यात रस्ता सुरक्षा विषयक विविध उपक्र मांचे आयोजन करण्यात आले असून, यानिमित्त होणाऱ्या उपक्र मांमध्ये जिल्ह्यातील नागरिकांनी सहभागी व्हावे. तसेच रस्ता सुरक्षा पंधरवडा यशस्वी करावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते यावेळी रस्ता सुरक्षेच्या संदर्भातील माहिती पुस्तक व पत्रकांचे प्रकाशन करण्यात आले. तसेच यामाहा कंपनीद्वारे पुरस्कृत केलेल्या फिरत्या व्हॅनद्वारे आॅडिओ व्हिज्युअल माध्यमातून रस्ता सुरक्षा अनिवार्यता प्रबोधन उपक्र माचा शुभारंभ करण्यात आला. ही व्हॅन संपूर्ण जिल्ह्यात फिरणार असून, त्याद्वारे रस्ता सुरक्षेविषयी जनजागृती करण्यात येणार आहे. उप प्रादेशिक परिवहन अधिकारी पेण राजेंद्र मदने यांनी यावेळी या फिरत्या व्हॅनद्वारे आॅडिओ व्हिज्युअल माध्यमातून शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सहभागाने जनजागृती करण्यात येणार आहे. वाहन चालविताना मोबाइलवर संभाषण करणे, हॅल्मेट न घालणे यावर वाहतूक पोलीस व परिवहन विभागामार्फत कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच रस्त्यावर वाहन चालवताना वाहन सुरक्षित चालवावे, वाहनापासून प्रदूषण होणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे, असे सांगितले.या वेळी अप्पर जिल्हाधिकारी पी.डी.मलिकनेर, अप्पर पोलीस अधीक्षक संजय पाटील, पेण उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र मदने, जिल्हा माहिती अधिकारी डॉ.राजू पाटोदकर आदींसह परिवहन व पोलीस विभागाचे अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते. (विशेष प्रतिनिधी)
सुरक्षेसाठी वाहतूक नियमांचे पालन करा
By admin | Published: January 10, 2017 6:04 AM